
Mumbai : मुंबईच्या आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात बुधवारी पहाटे मेट्रोच्या कामादरम्यान भीषण अपघात घडला. अवजड सिमेंटचा बीम पिलरवर चढवताना अचानक क्रेनचे संतुलन बिघडल्याने ती उलटली आणि बीम मोठ्या आवाजासह खाली कोसळला. याबद्दलचे वृत्त न्यूज१८मराठी यांनी दिली आहे.
पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने मेट्रोचा बीम उचलण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने क्रेन एका बाजूला कलंडली आणि काही क्षणांतच पूर्णपणे उलटली.
क्रेन पलटल्यामुळे त्याला जोडलेला अवजड सिमेंटचा बीम मोठ्या आवाजासह खाली पडला. या घटनेने परिसरातील सुरक्षारक्षक आणि कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटना घडली त्या वेळी क्रेनच्या खाली किंवा बीम कोसळलेल्या ठिकाणी कोणताही कामगार नव्हता. तसेच पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अपघातानंतर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेन आणि कोसळलेला बीम हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.