
मुंबई : पैशांच्या अडचणींमुळे एका अभिनेत्याने गुन्हेगारीचा मार्ग निवडला. मुंबईच्या सांताक्रूझ भागात एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिची सोनसाखळी चोरल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला सोमवारी अटक केली. आशिष अत्तरचंद शर्मा असं या आरोपीचं नाव असून तो सांताक्रूझ (पूर्व) इथला रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली सोनसाखळी जप्त केली आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली.
वाकोला पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रविवारी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून तक्रारदाराच्या आईच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली आणि तिथून पळ काढला.
"ज्या ठिकाणी ही घटना घडली, ती एक दाटीवाटीची चाळ आहे. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते आणि कोणी प्रत्यक्षदर्शीही नव्हता. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पण तक्रारदाराने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी आजूबाजूच्या गल्ल्यांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा घटनेच्या वेळेस एक संशयित व्यक्ती वेशांतर करून त्या भागात फिरताना दिसली," असं उपनिरीक्षक सुशांतकुमार पाटील यांनी सांगितलं.
पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी या संशयिताचा फोटो काढला आणि त्याची ओळख पटवण्यासाठी तो स्थानिक खबऱ्यांपर्यंत पोहोचवला.अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांच्या एका पथकाने श्याम सुंदर चाळीत छापा टाकला आणि शर्माला बेड्या ठोकल्या.
चौकशीदरम्यान शर्माने पोलिसांना सांगितलं की, वाढत्या आर्थिक अडचणींमुळे त्याला चोरी करावी लागली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.शर्माने काही भोजपुरी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्याची माहिती समोर आली आहे.