
Asha Bhosle Last Rites : भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज असलेल्या आशा भोसले यांचे रविवारी (१२ एप्रिल) निधन झाले. तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे.
अशा भोसले यांच्या निधनाची बातमी समोर येताच देशासह जगभरातील चाहत्यांनी दुःख व्यक्त केले. राजकारणी, गायक, संगीतकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली.
आशा भोसले यांचे पार्थिव त्यांच्या कॅसा ग्रॅंडे येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांसह अनेक नेत्यांनी अंत्यदर्शन घेतले. तसेच ए. आर.रहमान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनीही हजेरी लावली.
आज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अंत्यदर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी ३.३० वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होणार असून शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मुंबई महापालिकेकडून अंत्यविधीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ५०० हून अधिक मान्यवरांसाठी आसन व्यवस्था, तसेच १० ते १२ हजार लोकांच्या उपस्थितीचा अंदाज लक्षात घेऊन LED स्क्रीन आणि ध्वनी व्यवस्था करण्यात आली आहे.
अंत्ययात्रा कॅसा ग्रॅंडे येथून सुरू होऊन पेनिन्सुला सिग्नल, वरळी नाका, डॉ. ॲनी बेझंट मार्ग, सिद्धिविनायक मंदिर मार्गे शिवाजी पार्क स्मशानभूमीपर्यंत जाणार आहे.
आपल्या लाडक्या गायिकेला अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईसह देशभरातून चाहत्यांचा ओघ सुरू आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अंत्यस्थळी त्यांच्या गाण्यांचे सूर घुमणार आहेत.