
मुंबई: मराठा नेते मनोज जरांगे हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला आज चौथा दिवस होता. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लाखो आंदोलक मुंबईत आले आहेत. मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर मुंबईत दाखल झाल्यामुळे रस्ते गर्दीने भरून गेले आहेत. अखेर या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टाने मराठा आंदोलकांना उद्या दुपारपर्यंत सर्व रस्ते रिकामे करण्याचा आदेश दिला.
३१ ऑगस्टला संध्याकाळी सव्वा सात वाजता एक दुर्घटना घडली आहे. मराठा आंदोलकांकडून बस फोडण्याचे आणि प्रवाशाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना ही बसमार्ग क्रमांक 201, सिरीयल क्रमांक 35, बसगाडी क्रमांक 7867, सांताक्रुज आगारच्या (मातेश्वरी) बसमध्ये घडली. दरम्यान, हाणामारीची घटना ही जुहू बस स्थानक येथील आहे.
बसगाडी ही जुहू बस स्थानक येथे उभी असताना आणि बसगाडी कर्मचारी नसताना मराठा आंदोलक आणि प्रवाशांमध्ये वादविवाद झाला आणि आंदोलकांनी एका प्रवाशाला बसमध्ये खाली पडून मारहाण केली होती. बसमधील तिसऱ्या क्रमांकाची खिडकीची काच फोडण्यात आली होती. वाद होत असल्याचा आवाज आल्याने प्रवर्तक आणि कर्मचारी बसमध्ये जाऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मराठा आंदोलक हे हुज्जत घालत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांना १०० क्रमांकाला कॉल करून मदतीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण पोलीस आल्यानंतर मराठा आंदोलक आणि वाद करणारे दोन प्रवाशी पण पळून गेले. याप्रकरणी पोलीस पुढं काय कारवाई करतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.