विक्रोळीत गुलमोहराचे झाड कोसळून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Published : May 29, 2025, 10:30 AM IST
Indore Labour Death

सार

मुंबईतील विक्रोळी येथे एका 26 वर्षीय तरुणावर गुलमोहरचे झाड कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खरंतर, मित्रांसोबत गप्पा मारत असताना तरुणाच्या अंगावर झाड उन्मळून पडल्याचे सांगितले जात आहे. 

Mumbai : मुंबईतील विक्रोळीतील कन्नमवार नगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गुलमोहराचे मोठे झाड अचानक कोसळल्यामुळे तेजस नायडू या 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेजस पॅराडाईस टॉवरमधील संक्रमण शिबिरात राहत होता. घटनेच्या वेळी तो आपल्या दोन मित्रांसह जनता मार्केटमधील गणेश मैदानात गप्पा मारत बसला होता. झाड अचानक उन्मळून अंगावर पडल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला, तर त्याचे मित्र किरकोळ जखमी झाले. जखमींनी तात्काळ तेजसला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्याआधीच मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

तेजसच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार होती. त्याने काही दिवसांपूर्वीच जुनी नोकरी सोडली होती आणि एका नव्या कंपनीत त्याची निवड झाली होती. मूळ नियोजनानुसार 26 मे रोजी म्हणजेच या घटनेच्या दिवशी त्याची रात्रपाळी सुरू होणार होती. परंतु त्या कंपनीच्या एचआर विभागाकडून आलेल्या दूरध्वनीनुसार त्याची जॉईनिंग 28 मे रोजी करण्यात आली. त्यामुळे नोकरीला न जाता, तो मित्रांसोबत मैदानात गेला होता. जर ही तारीख बदलली नसती, तर कदाचित तो त्या दिवशी ड्युटीवर गेला असता आणि त्याचे प्राण वाचले असते, असे स्थानिकांकडून बोलले जात आहे.

तेजसची बहीण नम्रता नायडू हिनेही यास दुजोरा देताना सांगितले की, "तेजस खूप मेहनती होता. त्याला नव्या नोकरीची खूप अपेक्षा होती. पण अचानक झाड कोसळल्यामुळे त्याचा जीव गेला. आम्ही त्याला गमावले, याचे दुःख शब्दांत मांडता येणार नाही."

कन्नमवार नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर उंच झाडं आहेत. अनेक झाडं रस्त्यालगत आणि इमारतींच्या संरक्षक भिंतींलगत असून, त्यांच्या फांद्या वेळेवर छाटल्या जात नाहीत. यामुळे अशी दुर्घटना घडण्याची शक्यता कायम असते. याबाबत स्थानिक रहिवासी राजेश सावंत म्हणाले, “आम्ही यापूर्वीही महापालिकेला यासंबंधी पत्र लिहिले होते. आता तेजसच्या मृत्यूनंतर पुन्हा पत्र लिहिले आहे. झाडांची नियमित पाहणी करून धोकादायक फांद्या छाटल्या गेल्या पाहिजेत. महापालिकेने वेळीच कारवाई करावी, ही आमची मागणी आहे."

PREV
Read more Articles on

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!