Ajit Pawar Funeral : बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, देशभरातून नेत्यांची उपस्थिती

Published : Jan 29, 2026, 08:34 AM IST
Ajit Pawar Funeral

सार

Ajit Pawar funeral : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विमान अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. 

Ajit Pawar Funeral : महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल ठसा उमटवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज (29 जानेवारी) बारामतीत अखेरचा निरोप दिला जाणार आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अचानक आणि धक्कादायक निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असून, कालपासून बारामतीत अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळलेला पाहायला मिळत आहे.

अंत्यसंस्काराला दिग्गज नेत्यांची उपस्थिती

अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते, मंत्री, खासदार आणि आमदार बारामतीत दाखल झाले आहेत. कालपासूनच हजारो नागरिक अजित पवारांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात गर्दी करत आहेत.

कसा झाला अपघात?

अजित पवार हे काल सकाळी खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी सुमारे 8.45 वाजता बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह दोन पायलट, एक क्रू मेंबर आणि सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. सुरुवातीला अपघाताची अधिकृत माहिती मिळाली नव्हती, मात्र काही मिनिटांतच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि राज्यात एकच खळबळ उडाली.

अपघाताची माहिती सर्वात आधी राजेश टोपेंना

या अपघाताची माहिती सर्वप्रथम माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते राजेश टोपे यांना मिळाली होती. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बारामती विमानतळावर काम करणाऱ्या एका तरुणाने त्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. “विमानाचा फक्त शेवटचा भाग दिसतोय, बाकी सगळं जळून खाक झालंय,” असे त्या तरुणाने सांगितल्याचे टोपे म्हणाले. ही आठवण सांगताना राजेश टोपे भावूक झाले आणि “आज माझा भाऊ गेल्यासारखं वाटतंय” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पवार कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

अपघाताच्या वेळी संपूर्ण पवार कुटुंब दिल्लीत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीत होते. दुर्घटनेची बातमी मिळताच संपूर्ण कुटुंब तात्काळ बारामतीकडे रवाना झाले. दोन्ही पवार कुटुंबांना जोडणारा मजबूत दुवा हरपल्याची भावना आज सर्वांच्या मनात आहे.

अंत्ययात्रेचा मार्ग आणि वेळापत्रक

अजित पवारांचे पार्थिव सकाळी 9 वाजेपर्यंत काटेवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर अँब्युलन्सद्वारे पार्थिव ग. दि. मा. सभागृहाकडे नेण्यात येईल. सकाळी 9 वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि ती विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर समाप्त होईल. सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक