
मुंबई: माजी मंत्री सुधाकर बडगुजर यांना भाजपात घेतल्यानंतर, काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्लाबोल करत थेट असा सवाल उपस्थित केला आहे की, "भाजप आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात घेणार का?" महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाच्या या भूमिकेवर टीकास्त्र सोडताना भाजपाच्या कथित हिंदुत्ववादी चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
"भाजप स्वतःला जगातला सर्वात मोठा पक्ष मानतो. पण सध्या हा पक्ष कोणालाही अगदी पूर्वी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गुन्हेगारीचे आरोप केले, त्यांनाही उघडपणे पक्षात घेतो आणि त्यांना मंत्रिपदेही देतो," असं सपकाळ म्हणाले. त्यांनी पुढे जोरदार सवाल उपस्थित करत विचारलं "ज्याच्यावर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी विधानसभेत केला होता, त्यालाच आज पक्षप्रवेश दिला जातोय. मग उद्या दाऊदलाही घेणार का, जर तो हिंदुत्व मान्य करतो म्हणाला तर?"
काँग्रेसने लक्ष वेधून दिलं की भाजप आमदार नितेश राणे यांनीच विधानसभेत सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाशिकमधील कुख्यात गुंड व दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासाठी बडगुजर यांनी पार्टी आयोजित केली होती आणि त्या पार्टीतील त्याचे फोटोही विधिमंडळात सादर झाले होते. मग आज त्या बडगुजरांना भाजपात सन्मानाने घेणं आणि “ते हिंदुत्व मानतात” असं सांगणं म्हणजे दुटप्पी भूमिका नव्हे का, असा स्पष्ट सवाल सपकाळांनी विचारला.
सपकाळांनी भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’ संस्कृतीवरही ताशेरे ओढले. ते म्हणाले, “गुंड, मवाली, भ्रष्टाचारी आज भाजपात प्रवेश करत आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीशी संबंधित व्यवहारात अडकलेले प्रफुल्ल पटेल यांच्याशी सत्तेत भागीदारी केली जाते. आणि नंतर त्यांनाही भाजप वॉशिंग मशीनमध्ये धुऊन स्वच्छ केलं जातं."
सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार आहे, याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनाही दुपारपर्यंत नव्हती, असं सपकाळ यांनी सांगितलं. "मग पक्ष चालवतोय कोण?" असा अत्यंत गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसचा आरोप आहे की भाजप सत्तेसाठी हिंदुत्वही विकतो आहे. ज्यांना एकेकाळी गुन्हेगार ठरवलं, त्यांनाच आता पक्षात घेतलं जातं. यामुळे भाजपाच्या "पार्टी विथ डिफरन्स" या प्रतिमेवर गडद सावल्या पडल्या आहेत.
"अपघात झाल्यानंतरच भाजपाच्या युती सरकारला जाग का येते? प्रशासनाला माहिती असूनही की पावसाळ्यात कुंडमाळा परिसरात शेकडो पर्यटक येतात, तरीही धोकादायक पूल खुला का ठेवण्यात आला? राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा," असं सपकळ म्हणाले.
"प्रशासन म्हणतं की त्या पुलावर सूचना फलक लावण्यात आला होता. पण प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे ५५ लोक वाहून गेले. त्यातील अनेकांना वाचवण्यात आलं, पण चार लोकांचा मृत्यू झाला आणि सहा गंभीर जखमी झाले. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत देणं म्हणजे सरकारची जबाबदारी संपली असं होत नाही," त्यांनी ठामपणे सांगितलं.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकळ यांनी सांगितले होते की, राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींविरोधात माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्ष पाठिंबा देईल. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू हे सध्या अमरावती जिल्ह्यात "अन्नत्याग" आंदोलनावर होते. आता त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.
"कडू यांनी उपस्थित केलेली मुद्दे वास्तव आहेत. शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळत नाहीत. राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत आहेत. सत्ताधारी पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनाचे जे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केलेले नाही," असे सपकळ म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकळ यांनी भाजप आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, आज जेव्हा शेतकऱ्यांना खरी गरज आहे, तेव्हा सरकार जाणीवपूर्वक कर्जमाफीच्या घोषणेपासून दूर पळत आहे.
सपकळ म्हणाले, "बेमोसमी पावसामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. मात्र, त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडे कोणतीही ठोस उपाययोजना नाही. निवडणुकीच्या काळात कर्जमाफीचे गाजावाजा करून आश्वासन देत भाजपने मते मागितली होती, पण आता सत्तेवर आल्यावर हेच सरकार कर्जमाफीच्या वचनापासून पळ काढत आहे."
त्यांनी सरकारवर निव्वळ फसवणूक केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.
भारतीय जनता पक्ष देशातील संविधान, लोकशाही व्यवस्था आणि महाराष्ट्र धर्माला बाधा आणत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. ही भेट शिष्टाचाराच्या निमित्ताने झाली असली, तरीही या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय घडामोडी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संविधान रक्षणासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. सपकाळ यांनी स्पष्ट केलं की, "लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे."