
राज्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्याचं दिसून येत आहे. आता कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मात्र उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन केलं आहे.
हवामान विभागाच्या वतीने रेड अलर्ट हा नाशिक, सातारा, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार, कोहापूर आणि रत्नागिरी आदी भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाची उघडीप राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा हा राजस्थानपासून ते ईशान्य बंगालपर्यंतच्या पट्यात सक्रिय असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं उर्वरित महाराष्ट्रात लवकरच पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकरी मात्र आभाळाकडं बघत पाऊस कधी येणार याकडं आस लावून बसला आहे.