
Weather Update : देशातील हवामानात पुढील काही दिवसांत मोठे बदल घडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ सत्य प्रकाश यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण अंदमान समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र २४ नोव्हेंबरपर्यंत Depression मध्ये परिवर्तित होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम दक्षिण भारत आणि अंदमान-निकोबार बेटांवर होणार आहे. या हवामान बदलामुळे काही राज्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, दुसरीकडे उत्तर भारतात पुन्हा थंडी वाढणार आहे. मध्य भारतातही तापमानात चढ-उतार दिसत असून, संपूर्ण देशात संमिश्र हवामानाची स्थिती तयार झाली आहे.
हवामान तज्ज्ञ सत्य प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 10 दिवसांत देशाच्या हवामानात मोठे बदल दिसू शकतात. २२ नोव्हेंबर रोजी दक्षिण अंदमान समुद्राजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते २४ नोव्हेंबरपर्यंत Depression मध्ये परिवर्तित होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीचा थेट परिणाम पुढील काही दिवसांत दक्षिण भारत आणि अंदमान-निकोबार बेटांवर पाहायला मिळणार आहे.
या नव्या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे अंदमान-निकोबार बेटांवर २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये २२ ते २४ नोव्हेंबर, तर केरळमध्ये २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशाराही देण्यात आला आहे. विशेषतः, २३ नोव्हेंबर रोजी अंदमान-निकोबारसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशाच्या मध्य-पश्चिम भागातही हवामानात महत्त्वाचे बदल दिसत आहेत. पश्चिम मध्य प्रदेशात २२ आणि २३ नोव्हेंबरला थंडीची लाट कायम राहू शकते. मात्र महाराष्ट्रात थंडी वाढण्याऐवजी पुढील तीन दिवसांत किमान तापमान २ ते ३ अंशांनी वाढेल. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांत पडू शकतो, तरी अतिवृष्टीचा कोणताही धोका नाही. पुढील 48 तासांत पावसाची शक्यता अत्यल्प असल्याचे IMD ने स्पष्ट केले आहे.
दक्षिण भारतात अतिवृष्टी आणि मध्य भारतात तापमान वाढीची लक्षणे असली, तरी उत्तर-पश्चिम भारतात थंडी वाढणार आहे. पुढील आठवड्यात या प्रदेशातील किमान तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागांमध्ये गारठा वाढेल. देशाच्या इतर भागांत मात्र तापमानात मोठा बदल होणार नाही.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे समुद्रावरील स्थिती खवळलेली राहणार आहे. पुढील ५ ते ६ दिवस मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा कडक सल्ला हवामान विभागाने दिला आहे. वादळी वाऱ्यांमुळे मासेमारीसाठी जाणे धोकादायक ठरू शकते.