
मुंबई : महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. विरूळ गावाजवळ भरधाव ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिल्यानंतर अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर एका कारला मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला फेकली गेली. यानंतर कारने पेट घेतली. आगीचे धूर कारमधून निघू लागले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आग इतक्या वेगाने पसरली की कारमधील प्रवाशांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. यामुळे कारमध्ये प्रवासी अडकले गेले.
Wardha, Maharashtra: Five people were killed, and one person sustained serious injuries in a horrific road accident on the Samruddhi Expressway near the Virul Interchange under the jurisdiction of Pulgaon Police Station, according to Wardha Police.
The accident occurred after an… pic.twitter.com/6U46D5X1FX— ANI (@ANI) July 20, 2026
या अपघातात ट्रकमधील एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि आपत्कालीन यंत्रणांच्या सहकार्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
प्राथमिक तपासानुसार, ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील सुरक्षितता, वाहनांचा वेग आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.