
पुणे: साहित्य वर्तुळातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि 'पानिपत'कार विश्वास पाटील यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी स्वतः ही घोषणा केली. यंदाचे हे बहुप्रतिक्षित संमेलन सातारा येथे होणार असून, यामुळे साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
विश्वास पाटील यांच्या 'पानिपत' या ऐतिहासिक कादंबरीला वाचकांनी भरभरून प्रेम दिले आहे. या कादंबरीने मराठी साहित्यात एक वेगळा ठसा उमटवला. अध्यक्षपदासाठी रंगनाथ पठारे आणि ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या नावांचीही चर्चा होती, परंतु महामंडळाच्या सदस्यांनी एकमताने विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
एक साहित्यिक म्हणून विश्वास पाटील यांनी मराठी साहित्याला अनेक उत्कृष्ट कलाकृती दिल्या आहेत. 'चंद्रमुखी', 'झाडाझडती', 'पांगिरा', 'क्रांतिसूर्य', आणि 'आंबी' यांसारख्या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. 'पानिपत' ही त्यांची विशेष गाजलेली कादंबरी.
साहित्यिक कारकिर्दीसोबतच, विश्वास पाटील यांनी एक सनदी अधिकारी म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी प्रशासकीय सेवा दिली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मात्र, या कार्यकाळात त्यांच्यावर काही प्रकल्पांना मंजुरी देताना अनियमितता केल्याचे आरोप झाले होते.
यंदाच्या संमेलनानंतर, पुढील तीन संमेलने १०० वे आणि १०१ वे ही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून पार पाडली जातील, अशी माहितीही समोर आली आहे. विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखालील हे संमेलन साताऱ्यात एक अविस्मरणीय साहित्यिक पर्वणी ठरेल अशी अपेक्षा आहे.