
पुणे - माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने हे पद सध्या रिक्त आहे. या पदासाठी उद्या मंगळवारी निवडणूक होणार आहे. भाजपा नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना आपला उमेदवार घोषित केले आहे. तर INDIA आघाडीने माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार केले आहे.
या सगळ्यात पुण्यातील एका व्यक्तीनेही आपले नामनिर्देशन दाखल केल्याचा दावा केला आहे. 9 सप्टेंबरला निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
ही व्यक्ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावचे उमेश म्हेत्रे. ते एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत.
माध्यमांशी बोलताना म्हेत्रे म्हणाले, “मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे. काल मी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. मी गरीब आणि गरजू लोकांची मदत करतो, त्यांच्या वैद्यकीय आणि आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मुंबई- दिल्लीला जातो. लोकांच्या पोलिस प्रकरणांमध्ये मदत करतो. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदवतो. मी खासदारांना माझ्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करतो.”