Vaishnavi Hagawane Death Case: 'मामा, माझी चूक झाली...' ICUमध्ये वडील, तिने शेवटी हेच सांगितलं; मामाचा थरारक खुलासा

Published : May 22, 2025, 03:34 PM IST
vaishnavi hagvane

सार

राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा मृत्यू अपघात नसून हुंडाबळी असल्याचा आरोप वैष्णवीच्या मामांनी केला आहे. लग्नानंतर सहा महिन्यांतच वैष्णवीला मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागला होता. वैष्णवीने आपल्या मामांना आपली व्यथा सांगितली होती.

पुणे: राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात दररोज नवे पैलू समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशीतील नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा मृत्यू फक्त एक ‘अपघात’ नव्हे, तर थेट हुंडाबळी असल्याचा गंभीर आरोप आता वैष्णवीच्या मामांनी केला आहे. वैष्णवीचा मृत्यू होऊन राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक सध्या फरार आहेत. दरम्यान, पक्षानेही कठोर पावले उचलत राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी केली आहे.

'हे लग्न माझी चूक होती मामा...', वैष्णवीचं अंतःकरण हेलावणारे बोल

 वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी सांगितले की, “वैष्णवीचं लग्न लव्ह मॅरेज होतं. घरातल्या अनेकांचा विरोध होता. पण ती वारंवार माझ्याकडे म्हणायची की मला शशांकसोबतच लग्न करायचं आहे. हगवणे कुटुंबाने तिच्यावर असा काही प्रभाव टाकला की, ती कोणाचंही ऐकायला तयार नव्हती. तेव्हा आम्ही हार मानली.” मात्र या प्रेम विवाहाचा शेवट अत्यंत दु:खद ठरला. बहिरट सांगतात, "लग्नानंतर सहा महिन्यांतच सगळं बदललं. घरात सतत कलह, मारहाण, मानसिक छळ सुरू झाला. एक दिवस वैष्णवी मला म्हणाली, ‘मामा, माझी चूक झाली...’ ते शब्द आजही मनात खोलवर कोरले गेलेत.”

आईसीयूमध्ये वडील, वैष्णवीचं मन हेलावून टाकणारं सत्य

त्याच काळात वैष्णवीच्या वडिलांची तब्येत बिघडली होती आणि ते ICUमध्ये होते. त्यावेळीही वैष्णवीने मामा उत्तम यांच्याशी संपर्क साधून आपल्या व्यथेला वाट मोकळी करून दिली. “ती मानसिकदृष्ट्या खचलेली होती. तिच्या वागणुकीतून दिसत होतं की ती फार मोठा त्रास सहन करत आहे,” असं भावुकतेने बहिरट यांनी सांगितलं.

'अजित पवारांनी न्याय द्यावा', मामाची भावनिक मागणी

या प्रकरणात आता फक्त हगवणे कुटुंबीय नव्हे, तर पक्ष आणि राजकीय स्तरावरही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. "अजित पवार या लग्नाला उपस्थित होते. आता त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या पक्षातील पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा," अशी मागणी वैष्णवीच्या मामांनी स्पष्ट शब्दांत केली आहे.

हे प्रकरण केवळ एका कुटुंबाच्या दुःखाची कहाणी नाही, तर स्त्रीविरोधी मानसिकतेच्या विषारी वास्तवाचं प्रतीक आहे. वैष्णवीच्या मृत्यूमागील सत्य पूर्णपणे उजेडात यायला हवं, जेणेकरून अशा आणखी कितीतरी वैष्णवींना न्याय मिळू शकेल.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'जिवंत सातबारा मोहीम' म्हणजे काय? तुमची अडचण कायमची कशी दूर होईल, पाहा!
नाताळात कन्फर्म तिकीट हवंय? कोकण रेल्वेची खास भेट!, 'या' विशेष गाड्यांचं संपूर्ण वेळापत्रक पाहा!