
मे महिन्यात मुंबई आणि आसपासच्या भागात अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसाने उकाड्याने त्रस्त नागरिकांना थोडासा दिलासा दिला असला, तरी या पावसाने वाहतूक, वीज आणि दळणवळण व्यवस्थेवर मोठा परिणाम केला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, वसई-विरार, डोंबिवलीसह अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह कोसळलेल्या पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर अवकाळी पावसामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी ते कर्जत मार्गावर लोकल गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. ओव्हरहेड वायर्सवर वाऱ्याचा जोर वाढल्याने गाड्यांची गती मंदावली असून हार्बर लाईनवरही गाड्या ५ ते ७ मिनिटे उशिराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील तीन ते चार तासांसाठी अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यांत ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच विजांसह गडगडाटी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईतील कांदिवली, बोरिवली, दहिसर, सायन, कुर्ला, चुनाभट्टी, तसेच ठाणे आणि अंबरनाथसारख्या भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असला, तरी या पावसामुळे अनेकांच्या दैनंदिन व्यवहारात अडथळे आले आहेत. अंबरनाथमध्ये वाऱ्यामुळे धुळीचे वादळ उठले असून, काही भागांत वीज पुरवठाही खंडित झाला आहे.
वसई-विरार परिसरात रात्री उशिरा झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केलं. जोरदार वाऱ्यांमुळे झाडांची फांदी तुटली, फुलबागा उद्ध्वस्त झाल्या, आणि अनेक रस्त्यांवर पाणी साचले. विरारमध्ये एका हळदी समारंभाचा मंडपच कोसळला, तर विद्युत उपकरणे आणि सजावटीच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे आयोजकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
कल्याण, अंबरनाथ आणि वसई-विरारसह अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला असून, महावितरणकडून वीज सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाऱ्यामुळे वीज वाहिन्या अडथळ्यात आल्यामुळे दुरुस्तीला विलंब होत आहे.
मे महिन्यात कोसळलेला हा अवकाळी पाऊस तापलेल्या वातावरणावर काहीसा आराम देणारा असला, तरी यामुळे शहरातील पायाभूत सुविधा आणि दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. पुढील काही तास हवामान आणखी अस्थिर राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सजग आणि सतर्क राहणं गरजेचं आहे.