Ambadas Danve : सोन्याचा चमच्यावरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला, दानवेंच्या निरोप समारंभात राजकीय धुरळा!

Published : Jul 16, 2025, 05:10 PM IST
uddhav thackeray eknath shinde

सार

विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय टोलेबाजी झाली. शिंदे यांनी 'सोन्याचा चमचा' असा उल्लेख केल्यावर ठाकरे यांनी 'भरल्या ताटाशी गद्दारी' असे प्रत्युत्तर दिले.

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यांचा कार्यकाळ संपल्याने साहजिकच विरोधी पक्षनेतेपदाचाही कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आज त्यांच्या निरोप समारंभात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या कारकिर्दीचे तोंडभरून कौतुक केले, पण त्याचवेळी समोर बसलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना सणसणीत टोले लगावले. गेल्या तीन वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच सभागृहात समोरासमोर आले होते, त्यामुळे या भाषणांकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दानवे यांच्या निरोप समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. एकेकाळी एकाच शिवसेनेत असलेले दानवे यांच्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र आल्याने त्यांच्या भाषणांबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.

'सोन्याच्या चमच्या'वरून शिंदेंनी डिवचलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात राजकारणावर फारसे भाष्य न करता अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेतेपदाची कारकीर्द, त्यांची अभिनव आंदोलने, सरकार आणि विरोधी पक्षांमधील समन्वय, तसेच सरकारच्या चांगल्या कामांना त्यांनी दिलेले समर्थन यावर भर दिला. मात्र, जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. शिंदे म्हणाले, "अंबादास दानवे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत, तरीही आपल्या कर्तृत्वाने ते विरोधी पक्षनेतेपदापर्यंत पोहोचले." सामान्यतः 'सोन्याचा चमचा' हा उल्लेख शिंदे ठाकरे यांच्या संदर्भात करतात, आणि आजही त्यांनी तेच करत नाव न घेता टोला लगावला.

उद्धव ठाकरेंनी दिलं सडेतोड उत्तर

एकनाथ शिंदे यांचे भाषण संपताच सभापती प्रा. राम शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव पुकारले. उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या पहिल्याच वाक्यात जोरदार 'षटकार' ठोकला. "अंबादासजी, तुम्ही आज जरी सभागृहातून जात असला, तरी 'मी पुन्हा येईन' बोला आणि त्याच पक्षातून येईल असे बोला," असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. त्यांच्या या पहिल्याच टोल्याने विधान परिषदेत हास्यकल्लोळ झाला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "काही जण आज अंबादास दानवे यांचे कौतुक करत असले तरी, मी ज्यावेळी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली होती, त्यावेळी काहींचे चेहरे वेगळे होते." अप्रत्यक्षपणे शिंदे यांना उद्देशून ते म्हणाले, "आज आत्ता मुख्यमंत्री नाहीत, त्यांना धन्यवाद देतो, प्रांजळपणे कबूल करतो, भाजप संघाच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता त्यांनी आम्हाला दिला. त्यांना मी जसे धन्यवाद देतोय, तसे धन्यवाद ते मला देत आहेत की नाही... कारण त्यांनी माझ्याकडून बरेच सहकारी घेतलेत..." असे तिखट फटकारे ठाकरे यांनी लगावले.

'भरल्या ताटाशी गद्दारी नाही!'

ठाकरे यांनी दानवे यांच्या कार्याचा गौरव करत सांगितले, "दानवेजी, तुमचा अभिमान आहे. शिवसेनाप्रमुखांनाही तुमचा अभिमान वाटत असेल, परंतु हळहळ वाटत असेल की पहिली टर्म बघता बघता पूर्ण झाली. पदे येतात, जातात पण त्या पदाचा उपयोग जनमाणसांसाठी करायचा असतो. जनमाणसांत आपली प्रतिमा काय आहे, हे माणसांच्या आयुष्याचे फलित असते."

शेवटी, एकनाथ शिंदे यांनी 'सोन्याचा चमचा' या केलेल्या उल्लेखाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, "आत्ता उल्लेख झाला की अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. अगदी खरे आहे की ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. पण त्यांनी भरलेल्या ताटाशी कधी प्रतारणा केली नाही. ज्यांनी ताट दिले त्या पक्षाशी प्रतारणा केली नाही. ताटातले माझेच आहे, असेही ते म्हणाले नाहीत. किंवा अजून काही मिळावे म्हणून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचे, असा अपराधही त्यांनी केला नाही, यासाठी जनता दानवे यांना धन्यवाद देत असेल."

ठाकरे यांच्या या बोलण्यातून पक्षफुटीची खंत स्पष्ट दिसत होती. यावरून त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता, विधान परिषदेच्या सभागृहात, अगदी समोरासमोर त्यांना जोरदार सुनावले.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

नवविवाहितेची बंगळुरुत तर पती-सासूचा नागपुरात आत्महत्येचा प्रयत्न, तरुणाचा मृत्यू तर सासू रुग्णालयात!
Maharashtra : अजित पवार अचानक नॉट रिचेबल! बारामती हॉस्टेलमधून कोणालाही न सांगता रवाना, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण