
परभणी शहर पुन्हा एकदा भीषण अपघाताच्या बातमीने हादरलं आहे. पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेला ३१ वर्षीय स्वप्निल लहाने आणि २५ वर्षीय कृष्णा जगताप या दोघा युवकांचा उड्डाण पुलावर झालेल्या दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. एका क्षणात दोन कुटुंबांवर काळाने घाला घातला आणि संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
"मित्रांना भेटायला" गेलेला स्वप्निल कायमचा गेला स्वप्निल लहाने, लक्ष्मीनगर, जुना पेडगाव रोड, परभणी येथे राहणारा हा तरुण, आयुष्याची स्वप्नं उराशी बाळगून पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. काही महिन्यांत कुटुंबासह परदेशात जाण्याची योजना होती. मात्र, नियतीने वेगळाच खेळ रचला.
मित्रांना भेटण्यासाठी तो संध्याकाळी दुचाकीवरून घराबाहेर पडला आणि परभणी उड्डाण पुलावरून जात असताना त्याच दुचाकीला समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसली. कृष्णा दिलीप जगताप (वय २५) हा युवकही या अपघातात जागीच ठार झाला.
नियंत्रण नसलेल्या वाहतुकीचा बळी साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही दुचाकी ओव्हरटेक करत असताना धडकल्या. एका दुचाकीवर दोघे आणि दुसऱ्या दुचाकीवर तिघे प्रवासी होते. अपघात इतका भीषण होता की दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अपघात मात्र वाढतेच आहेत परभणी शहरातील वाहतूक यंत्रणा अक्षरशः ठप्प आहे. उड्डाण पुलावर ना कोणतीही ट्रॅफिक सिग्नल व्यवस्था, ना ट्रॅफिक पोलिसांची उपस्थिती. मागील काही महिन्यांपासून या पुलावर अपघाताचं प्रमाण वाढलेलं असून तरीही प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे.
कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला आहे. “एका सिग्नलने दोन तरुणांचे प्राण वाचले असते” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
स्वप्निल आणि कृष्णा आता परत येणार नाहीत. पण शहरातील इतर तरुणांचे प्राण असेच धोक्यात राहणार का? वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा आणि पोलिसांची जबाबदारी याबाबत प्रशासन कोणती पावलं उचलणार?