
मुंबई: आपल्या धडक कारवाईसाठी नेहमीच चर्चेत असणारे आयएएस अधिकारी आणि महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. तंबाखू, पान मसाला आणि गुटख्याची जाहिरात करणाऱ्या नटांवर ते चांगलेच भडकले आहेत. हॉटेलमधील अस्वच्छता आणि बनावट पनीर बनवणाऱ्यांवर छापे टाकून मुंढेंनी संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. आता त्यांनी आपला मोर्चा बॉलिवूडच्या बड्या स्टार्सकडे वळवला आहे.
तंबाखू आणि पान मसाल्यासारख्या उत्पादनांची छुपी जाहिरात (Surrogate Advertising) केल्याप्रकरणी एफडीएने बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan), अजय देवगण (Ajay Devgn) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांना कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) पाठवली आहे. मुंढेंच्या या कडक पावलामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या नोटीसला योग्य उत्तर न दिल्यास या नटांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही एफडीएने दिला आहे.
एनडीटीव्ही (NDTV) च्या एका विशेष कार्यक्रमात बोलताना तुकाराम मुंढे यांनी पान मसाला आणि गुटख्याची जाहिरात करणाऱ्या नटांच्या दुटप्पीपणावर सडकून टीका केली.
"दुटप्पी वागणाऱ्या लोकांची मला प्रचंड चीड येते. मला कोणालाही विरोध करायला आवडत नाही, पण मी दुटप्पीपणा कधीच खपवून घेत नाही. कारण असा स्वभाव मला मुळातच आवडत नाही. तुम्ही जे काम करता, जे बोलता आणि जसे वागता, त्यात जर प्रामाणिकपणा नसेल, तर तुम्ही खरे माणूसच नाही. तुम्ही लोकांसमोर एक चेहरा ठेवता आणि पडद्यामागे दुसराच चेहरा असतो..." अशा कडक शब्दांत मुंढेंनी या स्टार्सना सुनावले.
सेलिब्रिटींच्या जाहिरात करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंढे म्हणाले, "तुम्ही ज्या उत्पादनाची जाहिरात करत आहात, ते खरंच इतकं चांगलं असेल, तर आधी ते तुम्ही स्वतः वापरायला सुरुवात करा. जाहिरात करणाऱ्या व्यक्तीने ती वस्तू स्वतः वापरली पाहिजे. लोकांना ते वापरायला का सांगताय? पहिली सुरुवात स्वतःपासून करा. जर तुम्ही पान किंवा गुटख्याची जाहिरात करत असाल, तर आधी तो स्वतः खाऊन बघा. मग तुमच्या मुलांना खायला द्या, त्यांनाही त्याची सवय लावा."
पुढे बोलताना ते म्हणाले, "त्या पान मसाल्यात 'केशर' आहे, असा तुम्ही प्रचार करता. मग तुम्ही स्वतः तो का खात नाही? आधी तुम्ही स्वतः तो खाऊ शकता ना. तुमच्या स्वतःच्या कुटुंबाला खायला देऊ शकता. त्यानंतर देशातल्या इतर लोकांना तो खाण्याचा सल्ला द्या... नियम मोडून अशा धोकादायक उत्पादनांची जाहिरात करणं फक्त अनैतिकच नाही, तर पूर्णपणे बेकायदेशीर आहे," असा इशाराही त्यांनी दिला.