Pradeep Punekar Murder Case : ‘माझ्यावर बिनबुडाचे आरोप’; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Published : Oct 01, 2026, 11:51 AM IST
Pradeep Purnekar Murder Case

सार

ठाण्यात शिवसेना (UBT) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापले आहे. पूर्णेकर कुटुंबीयांनी मीनाक्षी शिंदेंवर आरोप केले असताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येने राजकीय वातावरण तापले आहे. 29 सप्टेंबर रोजी रात्री पूर्णेकर यांच्यावर गोळीबार आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत पुर्णेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी पूर्णेकर यांचे जुने सहकारी आणि मित्र प्रकाश ऊर्फ पप्या शिंदे याला अटक केली आहे. तर अन्य चार संशयितांचा शोध सुरू आहे.

पूर्णेकर कुटुंबीयांकडून मीनाक्षी शिंदेंवर आरोप

हत्येनंतर पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यासह त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणात संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, मीनाक्षी शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या 20 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अशा प्रकारचा आरोप पहिल्यांदाच झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजकीय आणि वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र कोणाच्याही जीवाला धोका निर्माण करण्याचे कृत्य आपण किंवा आपल्या कुटुंबीयांकडून होणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

‘राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये’

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगताना मीनाक्षी शिंदे यांनी या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे म्हटले आहे. वैचारिक मतभेद असले तरी त्याचे रूपांतर हिंसक कृत्यात करण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. ‘काहीजण या घटनेला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत,’ असा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला. या प्रकरणावर आपण बाहेरून परतल्यानंतर सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार

या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यास आपण पूर्ण सहकार्य करू, असे मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले. ‘माझी चूक नसेल तर चौकशीला सामोरे जाण्यास मला कोणतीही अडचण नाही,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही त्यांनी राजकीय टीका केली.

पप्या शिंदे पोलिसांच्या ताब्यात; अन्य आरोपींचा शोध सुरू

दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पप्या शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्ल्यावेळी पप्या शिंदे घटनास्थळी उपस्थित होता आणि त्याने जखमी पूर्णेकर यांना रुग्णालयात नेले होते. तपासादरम्यान त्याच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील अन्य चार संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या विविध टीम रवाना करण्यात आल्या आहेत. या हत्येमागील नेमका हेतू काय होता, हल्ल्याचे नियोजन कसे करण्यात आले आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. मीनाक्षी शिंदे यांच्यावरील आरोपांबाबतही तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येणे अपेक्षित आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Pradeep Purnekar Murder : ठाण्यात ड्रग माफिया आणि बिल्डर लॉबीला भिडल्यानेच पूर्णेकरांचा गेम; राऊतांचा आरोप
Pradeep Purnekar Death : ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या