
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नावाचा सगळीकडं बोलबाला सुरु आहे. अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. देशभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कठोर कारवाई केली. यानंतर आता अक्कलकोट येथील दुकान विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. अक्कलकोट परिसरातील २३ दुकानांच्या चाचण्या करण्यात आल्या. पेढा आणि बर्फीच्या नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. आता संपूर्ण जिल्ह्यातच अन्न आणि औषध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. येथील भेसळ करणाऱ्या दुकानदारांना मोठा दंड करण्यात आला.
अक्कलकोट नगरीतील भेसळखोरांना दंड ठोठावण्यात आला आहे. येथे एकूण ३० व्यावसायिकांच्या दुकानातील मालाची तपासणी करण्यात आली. त्यामधील १३ व्यावसायिकांच्या विरोधात कलम ६९नुसार कारवाई करण्यात आली. आता परत एकदा अक्कलकोटमध्ये विशेष मोहीम राबवून तपास केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.