
मुंबई: मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आज एक भावनिक व राष्ट्रभक्तीने भारलेली तिरंगा यात्रा पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून भारतीय सशस्त्र दलांना मानवंदना दिली. ही यात्रा ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कारवाईनंतर भारतीय सेनेच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
तिरंगा यात्रेत हजारो नागरिक, युवा, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, माजी सैनिक आणि विविध धर्मीय समुदायांचे प्रतिनिधी सहभागी झाले. सर्वांच्या हातात तिरंगा, आणि हृदयात एकच भावना जय हिंद! मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “भारतीय सेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवाद्यांना जे सडेतोड उत्तर दिलं, त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. आपली सेना, आपले जवान हे देशाचे खरे रक्षक आहेत. त्यांच्या पराक्रमाला सलाम करत आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत.”
२६ निष्पाप जणांच्या बळी जाणाऱ्या पहलगाम हल्ल्यानंतर, ७ मे रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानात घुसून १००हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईमुळे संपूर्ण देशात देशभक्तीचा सळसळता लाट उसळली आहे.
संध्याकाळी ५.२० वाजता सुरू झालेल्या या यात्रेत गिरगाव चौपाटी तिरंग्यांनी आणि देशप्रेमाच्या घोषणांनी गाजत होती. “भारत माता की जय”, “जय जवान जय हिंद”, अशा घोषणा वातावरण दुमदुमवत होत्या.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे यात्रेला एक वेगळाच सन्मान प्राप्त झाला. त्यांनी जनतेला राष्ट्रासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत एकात्मतेचे आणि निर्भीडतेचे प्रतीक असलेली तिरंगा यात्रा ही केवळ कार्यक्रम नसून, भारताच्या संकल्पशक्तीचे प्रदर्शन आहे, असं सांगितलं.