
सोलापूर | प्रतिनिधी संपूर्ण आयुष्याची सुरुवात करणाऱ्या नववधूच्या पायाखालची जमीनच अचानक सरकली. सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील एका नवविवाहित तरुणीचा, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. जनाकी कल्याण गळगुंडे (वय २२) असे तिचं नाव असून, या हृदयद्रावक घटनेनं गावात शोककळा पसरली आहे.
१६ मे रोजी जनाकीचं विवाहसोहळा पार पडला होता. घरात शुभशकुनाचं वातावरण, नातवंडांच्या लग्नाचं स्वप्न पाहणारे वडील, सासरी नवं आयुष्य सुरू करणाऱ्या मुलीचा उत्साह — हे सगळं अवघ्या काही तासांत काळाच्या कवेत गेले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी, जनाकीला छातीत वेदना जाणवू लागल्या आणि काही क्षणांतच तिचा मृत्यू झाला.
जेथे अद्याप मेंदीचा रंगही फिकट झाला नव्हता, तिथं आता पांढऱ्या फुलांनी आंगण भरलं. नवरदेव, नातेवाईक आणि गावकरी अश्रूंना बांध न राहता हंबरडा फोडत होते. कोणी कल्पनाही केली नव्हती की लग्नाचं मंगल वातावरण इतकं लवकर शोकांतिका ठरेल.
२२ वर्षांची नवविवाहित मुलगी हृदयविकाराने कशी मरण पावली, हा अनेकांचा प्रश्न आहे. जनाकीला पूर्वीपासून कोणतीही गंभीर तब्येतीची तक्रार नव्हती, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. डॉक्टरांनी प्राथमिक अहवालात 'हार्ट अटॅक' असल्याचं नमूद केलं आहे. एक स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच संपलं. जनाकीचं लग्न, तिचं नविन आयुष्य, सासरीची जबाबदारी, आई-वडिलांची आशा — हे सगळं एका क्षणात कोसळलं. ही बातमी समजताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.