
Thane Traffic Update : ठाणे शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची वाहतूक सूचना जाहीर करण्यात आली आहे. पाणीपुरवठा पाइपलाइनच्या कामामुळे शहरातील काही महत्त्वाचे सेवा रस्ते 23 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत बंद राहणार आहेत. या दरम्यान वाहतूक तात्पुरती वळवण्यात येणार असून वाहनचालकांनी प्रवासापूर्वी मार्गांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी स्टील नाका ते माजिवडा मेट्रो स्टेशन दरम्यानचा सेवा रस्ता तसेच रवी स्टील नाका ते कॅडबरी जंक्शन (ज्युपिटर मार्गे) हा सेवा रस्ता पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याचे काम या मार्गांवर सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या कामादरम्यान हार्दासनगर कट येथे वाहतूक वळवण्यात येईल. प्रशासनाकडून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित परिसरात काही प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
1. हार्दासनगर येथून डावीकडे वळून वसंत लॉन्ससमोरील रस्ता वापरावा.
2. ज्युपिटर कटवरून उजवीकडे वळून ज्युपिटर हॉस्पिटलसमोरील स्लिप रोडचा वापर करावा.
3. लोढा कासा किंवा टीसीएसकडून येणाऱ्या वाहनांनी हार्दासनगर येथे उजवीकडे वळावे.
वाहतूक बदलांमुळे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी शक्य असल्यास पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, गर्दीच्या वेळा टाळाव्यात आणि प्रवासापूर्वी मार्गाची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.