Thane Fire News : गावदेवी भाजी मार्केटला भीषण आग, दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू

Published : May 21, 2026, 09:32 AM IST
Thane Fire News

सार

Thane Fire News : ठाण्यातील गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळ असलेल्या भाजी मार्केटला पहाटे भीषण आग लागून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ठाणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन विभागातील अधिकाऱ्याचा समावेश आहे. 

Thane Fire News : ठाणे शहर आज पहाटे भीषण आग दुर्घटनेने हादरले. नौपाडा परिसरातील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भीषण होती की, बचावकार्यासाठी धावलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांसह महानगरपालिकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन अग्निशमन कर्मचारी जखमी झाले आहेत. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

पहाटे ३.४३ वाजता लागली आग

आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आज पहाटे ३:४३ वाजण्याच्या सुमारास गावदेवी भाजी मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. गोखले रोड, नौपाडा परिसरातील या बाजारपेठेत आग वेगाने पसरल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

 

 

बचाव मोहिमेदरम्यान दोन जणांचा मृत्यू

आग विझवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक काळू शंकर गाडेकर (वय ५३) आणि अग्निशमन केंद्रातील स्थानक अधिकारी सागर शिंदे (वय ४३) यांचा समावेश आहे. दोघांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दोन अग्निशमन कर्मचारी जखमी

या दुर्घटनेत अग्निशमन विभागातील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सुजित पष्टे (वय ४५), स्थानक अधिकारी आणि समीर जाधव (वय ४०), तांडेल यांचा समावेश आहे. दोघांवरही छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

आगीवर नियंत्रणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, जम्बो वॉटर टँकर, अतिरिक्त वॉटर टँकर्स, दोन रेस्क्यू वाहने आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

गावदेवी भाजी मार्केटमध्ये आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात असली, तरी अधिकृत तपासानंतरच कारण स्पष्ट होणार आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक