
मुंबई : राज्यातील राजकारणाला एक मोठा कलाटणी देणारा निर्णय घेण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तब्बल २० जिल्हाध्यक्ष लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश प्रा. जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, शिवसेना नेते उदय सामंत यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेत प्रवेश
उदय सामंत यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रा. जालिंदर पाटील यांनी २० जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून, एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या विकासासाठी हा टप्पा अत्यंत निर्णायक ठरेल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. लवकरच हे सर्व जिल्हाध्यक्ष अधिकृतपणे पक्षप्रवेश करतील.
सत्तेतील नाराजी शमवण्यासाठी महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला
दरम्यान, राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद वाटपावरून नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर आता महामंडळांच्या वाटपाचा नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. सूत्रांनुसार, भाजपला ४४, शिंदे गटाला ३३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २३ महामंडळं दिली जाणार आहेत.
या फॉर्म्युल्यामुळे नाराज आमदारांना काही जबाबदाऱ्या देऊन शांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सत्तेत अनेक जण मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महामंडळे देऊन ते समेटाचा मार्ग शोधण्यात येणार आहे.
महायुती सरकारसाठी मोठा राजकीय टर्निंग पॉइंट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २० जिल्हाध्यक्षांचा शिवसेनेत होणारा प्रवेश हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा पुष्टी करणारा आहे. राज्यातील शेतकरी राजकारणात यामुळे नवा ट्रेंड सुरू होऊ शकतो. उदय सामंत यांच्या राजकीय चातुर्यामुळे हा प्रवेश साकार होतोय, हेही लक्षात घेणं महत्त्वाचं ठरेल.