
Suresh Kalmadi Passed Away : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज, 6 जानेवारी रोजी पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारपणामुळे त्रस्त होते. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणात एक प्रभावी अध्याय संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता. त्यांनी अनेक वर्षे पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पुण्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता आणि दीर्घकाळ त्यांची शहराच्या राजकारणावर पकड राहिली. त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या.
2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याच्या आरोपांमुळे सुरेश कलमाडी यांची राजकीय कारकीर्द डागाळली. आयोजन समितीचे अध्यक्ष असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते आणि त्यांना अटकही झाली होती. मात्र, अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर एप्रिल 2025 मध्ये ईडीकडून दाखल क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट मिळाली. तरीही, त्यानंतर ते पुण्याच्या राजकारणात प्रभावी कमबॅक करू शकले नाहीत. गेल्या काही वर्षांत आजारपणामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.
सुरेश शामराव कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नेते, पुण्याचे अनेक वेळा खासदार आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक होते. त्यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तसेच 2010 दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. राजकारणात येण्यापूर्वी ते भारतीय वायुसेनेत वैमानिक (Pilot) होते.