
ST Bus : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कर्मचारी संघटनांच्या तक्रारी आणि मागण्यांवर सखोल चर्चा करत त्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.
या बैठकीत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे त्यांच्या पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटीमधील सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघाने चालक-वाहकांवरील कारवाई, आगार व्यवस्थापनातील अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर संघाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक चर्चा केली. कर्मचाऱ्यांना न्याय देणे हेच महामंडळाचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रक्रियेची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
एसटीचे कामकाज अधिक पारदर्शक आणि प्रवासी-कर्मचारी हिताचे करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. चालक-वाहकांना भेडसावणाऱ्या अडचणी, आगार पातळीवरील निर्णयप्रक्रिया आणि शिस्तभंग कारवाई यामध्ये न्याय्य व पारदर्शक पद्धती अवलंबण्याचे निर्देश देण्यात आले.
मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, कर्मचारी संघटनांशी नियमित संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे. कर्मचाऱ्यांच्या अडचणींवर लवकरात लवकर उपाययोजना करून प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. या बैठकीला उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.