Maharashtra Weather : 20 मार्चपर्यंत अनेक भागात पावसाची शक्यता; मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Published : Mar 16, 2026, 09:08 AM IST
Maharashtra Weather

सार

Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. हवामान खात्याने 20 मार्चपर्यंत राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून पावसासह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. 

Maharashtra Weather : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. कधी कडाक्याचे ऊन तर कधी अचानक अवकाळी पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भर मार्च महिन्यात राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि जालना जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तापमानात मोठे चढ-उतार

दरम्यान राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अकोला येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली, तर निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 13.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. मालेगाव, वाशिम आणि सोलापूर येथे तापमान 40 अंशांच्या जवळ पोहोचले असून धुळे जिल्ह्यातही तापमानाचा पारा 39 अंशांच्या पुढे गेला आहे.

टोमॅटो दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

वाढत्या तापमानामुळे टोमॅटो लवकर पिकत असल्याने बाजारात त्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर कोसळले आहेत. गेल्या आठवड्यात 22 किलोच्या टोमॅटो क्रेटला सुमारे 350 रुपये भाव मिळत होता, मात्र सध्या तो अवघा 150 रुपयांपर्यंत खाली आला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना टोमॅटोला केवळ 7 ते 8 रुपये किलो दर मिळत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

2nd July 2025 News Updates : येत्या ४ आणि ५ जुलैला अतिमुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Rain Update : राज्यात मान्सूनचा जोर वाढला! मुंबईसह अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा