
Solapur Accident : पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील एकाच विस्तारित कुटुंबातील सदस्य सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतत असताना दुर्दैवी अपघाताला सामोरे गेले. सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे पुरुषोत्तम मासानिमित्त पूजा करून परतणाऱ्या भाविकांचा मिनी ट्रक सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील खोल विहिरीत कोसळला. काही क्षणांतच आनंदाचा प्रवास शोकांतिकेत बदलला.
रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. रांजणी गावातील भाविक सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते पंढरपूरकडे परतत असताना तांदुळवाडी परिसरात मिनी ट्रक अचानक रस्त्याबाहेर गेला आणि रस्त्यालगत असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळला. प्राथमिक माहितीनुसार, वाहनावरील नियंत्रण चालकाकडून सुटल्याने हा अपघात झाला. विहीर रस्त्याच्या अगदी जवळ असून तिच्याभोवती कोणतेही सुरक्षाकवच किंवा कठडे नसल्याचे समोर आले आहे.
Maharashtra | Atleast eight people lost their lives after a pickup vehicle plunged into a roadside well near Tandulwadi village (on the Pandharpur-Mhaswad route). Three were rescued and have been admitted to the hospital: Solapur Superintendent of Police Atul Kulkarni
— ANI (@ANI) June 14, 2026
अपघात घडताच मागून येणाऱ्या वाहनचालकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. काहींनी कोणतीही पर्वा न करता विहिरीत उडी मारून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर तांदुळवाडी गावातील नागरिकही बचावकार्यात सहभागी झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मिनी ट्रक विहिरीत पडताना पाहताच त्यांनी वाहन थांबवले आणि पाण्यात उडी घेतली. सर्वप्रथम दोन लहान मुलांना बाहेर काढण्यात यश आले. स्थानिकांच्या तत्परतेमुळे आठ जणांचे प्राण वाचू शकले.
या भीषण दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिलांसह चार लहान मुलांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या सर्व व्यक्ती पंढरपूर तालुक्यातील रहिवासी असून एकाच कुटुंबाशी संबंधित असल्याची माहिती प्रशासनाने दिली.अपघातात जखमी झालेल्या आठ जणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींवर तांदुळवाडी येथील दवाखान्यात उपचार करण्यात आले, तर इतरांना पुढील उपचारांसाठी पंढरपूरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेनंतर सातारा-पंढरपूर मार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, याच परिसरात काही दिवसांपूर्वी एका टेम्पोचाही अपघात झाला होता. मात्र त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीभोवती कठडे किंवा संरक्षक भिंत नसल्यामुळे अपघाताची तीव्रता वाढल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
विहिरीचे मालक बाळासो कदम यांनी प्रशासन आणि रस्ते बांधकाम कंत्राटदारांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. रस्ता रुंदीकरणापूर्वी विहीर मुख्य रस्त्यापासून दूर होती. मात्र जमीन अधिग्रहण आणि रस्त्याच्या उंचीतील बदलांमुळे ती वाहतुकीच्या मार्गाजवळ आली. कठडे उभारण्याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे सांगितले. विहीर रस्त्याच्या अतिशय जवळ असून आवश्यक सुरक्षाव्यवस्था नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी रस्ते बांधकाम कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सुरक्षा उपाययोजना वेळेत पूर्ण न केल्यामुळेच हा अपघात झाल्याचा त्यांचा आरोप आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त करत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यांनी जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली.