
मुंबई: सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावरील गंभीर आरोप प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. ज्याच्यावर सर्वांचे लक्ष लागले होते, त्या प्रकरणातील विवाहित महिला जान्हवी हिने सर्व आरोप मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे, फक्त 48 तासांमध्येच तिने आपल्या आरोपांपासून घुमजाव केल्याने या घटनेनं चर्चेला वेग मिळाला आहे.
जान्हवी हिने सिद्धांतवर मानसिक आणि शारीरिक छळ, धमकी, हुंडाबळी, फसवणूक आणि जबरदस्तीने गर्भपात करवल्याचे गंभीर आरोप केले होते. तिने वकिलामार्फत नोटीसही पाठवली होती. मात्र, आता या सगळ्या आरोपांपासून तिने पाठी फिरवत एक वेगळीच भूमिका घेतली आहे.
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी म्हणाली, "हे प्रकरण वैयक्तिक होतं. मला ते इथेच संपवायचं आहे. मी कुणालाही या प्रकरणात ओढलेलं नाही. जर कुणी माझ्या नावावरून राजकारण केलं, तर मी कायदेशीर पावलं उचलणार आहे." तिने स्पष्टपणे सांगितले की, संजय शिरसाट यांनी तिला कधीही त्रास दिला नाही आणि त्यांच्याविषयी तिला कुठलीही तक्रार नाही.
जान्हवीने पुढे सांगितले, "मी सिद्धांत यांना जी नोटीस पाठवली होती, तीही मी मागे घेत आहे. हा आमच्यातील एक पर्सनल मॅटर होता. लोकं त्याचं राजकारण करत आहेत. मीडियामध्ये विनाकारण चर्चाच सुरू आहे. मी मीडियाशी बोलून हे प्रकरण इथेच थांबवत आहे."
तिने सध्या या प्रकरणाला मिळालेलं समाजमाध्यमांवरील आणि राजकीय वलयातील लक्ष खटकत असल्याचंही म्हटलं. "माझं यावर काही म्हणणं नव्हतं, पण लोकं त्याला वेगळं वळण देत आहेत. त्यामुळे मी स्वतः माध्यमांसमोर येऊन सांगतेय की, मला हे प्रकरण वाढवायचं नाही."
सिद्धांत शिरसाट प्रकरणात आता महत्त्वाचा वळण आला असून, जान्हवीने सर्व आरोप मागे घेतल्याने यापुढे या प्रकरणात काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.