
Shaurya Din 2026 : भीमा कोरेगाव येथे आज, 1 जानेवारी रोजी 208 वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून लाखो भीम अनुयायी सकाळपासूनच भीमा कोरेगाव येथे दाखल झाले आहेत. संपूर्ण परिसरात उत्साह, शिस्त आणि अभिवादनाचा भाव पाहायला मिळत आहे.
उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भीमा कोरेगाव येथे उपस्थित राहून विजयस्तंभाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “आज मी अभिवादनासाठी आलो आहे. प्रशासनाने अत्यंत चांगली तयारी केली असून आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दुपारनंतर गर्दी वाढण्याची शक्यता आहे.”
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केले. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेचे कौतुक करत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भीमा कोरेगावचा लढा हा केवळ युद्ध नव्हता, तर तो जातीप्रथा आणि अन्यायकारक व्यवस्थेविरोधातील संघर्ष होता. आजच्या दिवशी त्या ऐतिहासिक लढ्यातील शूरवीरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
शौर्य दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडून 23 आरोग्य केंद्रे, 43 रुग्णवाहिका, 18 खासगी रुग्णालयांतील 286 खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. याशिवाय 155 प्रशिक्षित मनुष्यबळ, 150 पाण्याचे टँकर्स, 2,800 शौचालये, 265 सफाई कामगार आणि 9 हिरकणी कक्षांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये 1 महानिरीक्षक, 3 उपमहानिरीक्षक, 20 पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, 8 राज्य राखीव पोलिस दल तुकड्या, 3 शीघ्र प्रतिसाद दल, 14 घातपातविरोधी पथके, 18 बीडीडीएस पथके, 650 होमगार्ड आणि 4,700 पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यासाठी 251 ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.