
मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या तयारीत असलेल्या मुंबईत आज एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) तसंच पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला आहे. राऊतांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या एका कारवर हिंदीतून 'आज धमाका होगा' अशी धमकी लिहिल्याचे समोर आल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या एका गाडीच्या काचेवर साचलेल्या धुळीवर हाताने हिंदीत धमकी लिहिण्यात आली होती. "आज हंगामा होगा, आज रात बारा बजे बॉम्ब ब्लास्ट होगा", अशा आशयाचा हा मजकूर आहे. हा प्रकार राऊत यांच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने आमदार सुनील राऊत आणि मुंबई पोलिसांना याची माहिती दिली.
आज वर्षाचा शेवटचा दिवस (३१ डिसेंबर) असताना मिळालेल्या या धमकीमुळे पोलीस यंत्रणा प्रचंड सतर्क झाली आहे.
तपास सुरू: बॉम्ब शोधक पथक राऊतांच्या घरात आणि आजूबाजूच्या परिसरात 'मेटल डिटेक्टर'च्या सहाय्याने बारकाईने तपासणी करत आहे.
सुरक्षा वाढवली: कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी घराबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संशयित शोध: ही धमकी खरंच गंभीर आहे की केवळ थट्टा-मस्करी किंवा कुणाचा खोडसाळपणा आहे, याचा तपास पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून करत आहेत.
मुंबईत सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असतानाच, थेट संजय राऊत यांच्या घराबाहेर अशा प्रकारे धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. हा नेमका काय प्रकार आहे, याबाबत पोलीस लवकरच अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.