वानखेडे स्टेडियममधील स्टॅण्डला शरद पवार यांचं नाव, 'माझं नाव का घेतलं हे मला माहित नाही...'

Published : May 16, 2025, 08:35 PM ISTUpdated : May 16, 2025, 08:36 PM IST
Sharad Pawar

सार

वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार यांच्या नावाने स्टॅण्डचे नामकरण करण्यात आले. मात्र, पवारांनी या सन्मानाबद्दल नम्रता व्यक्त करत, स्टेडियम उभारणीतील सर्वांचे योगदान अधोरेखित केले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मुंबई: वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या एका खास सोहळ्याने क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या वतीने स्टेडियममधील एका स्टॅण्डचं नामकरण शरद पवार यांचं नाव देऊन करण्यात आलं. मात्र या वेळी खुद्द शरद पवारांनीच दिलेलं प्रांजळ वक्तव्य उपस्थितांच्या मनाला भिडलं. “या नावांमध्ये माझं नाव का घातलं, हे मला माहित नाही.”

“वानखेडे स्टेडियम उभं करण्यामागे सर्वांची मेहनत होती”

या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, “आजचा हा सोहळा छोटासा असला तरी अतिशय आगळावेगळा आहे. हे स्टेडियम वानखेडे साहेबांच्या नावानं आहे. त्या काळात मी क्रीडा खात्याचा मंत्री होतो. ही जागा मिळवणं, स्टेडियम उभं करणं. या सगळ्या प्रक्रियेत वानखेडेंचे खूप मोठे कष्ट होते. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत होतो. पॉली उमरीगर आणि त्या काळातले अनेक नामवंत खेळाडू यांचं योगदानही विसरून चालणार नाही.”

क्रिकेटप्रेमातील एक इतिहास... आणि पुन्हा उभारलेलं वानखेडे

“या स्टेडियमचा एक इतिहास आहे,” असं सांगत पवारांनी जुन्या घटनेचा उल्लेख केला. “एका सामन्यादरम्यान झालेल्या वादामुळे प्रेक्षक संतप्त झाले. त्यांनी स्टेडियम सोडलं आणि मैदानात शिरले. नंतर स्टेडियम उद्ध्वस्त करण्यात आलं. अशा कठीण काळात मुंबई क्रिकेट असोसिएशनपुढं पुन्हा स्टेडियम उभं करण्याचं मोठं आव्हान होतं. मात्र महाराष्ट्रातील काही उद्योगसमूहांनी पुढे येत आर्थिक मदत केली आणि वर्ल्ड कप सुरू होण्याच्या आधीच हे स्टेडियम पुन्हा उभं राहिलं.”

"या नावात माझं नाव का?", शरद पवार यांची नम्रता

स्टॅण्डला स्वतःचं नाव दिल्याबद्दल पवार म्हणाले, “या नामांकीत खेळाडूंच्या यादीत माझं नाव का घेतलं गेलं, हे मलाही समजलेलं नाही. मात्र MCA कडून मिळालेला हा सन्मान मला भावतो. आणि मी त्याचा आभारी आहे.”

गावस्कर, रवी शास्त्री, रोहित शर्मा ह्या नामवंतांची स्मृती जपणारा उपक्रम

पुढे बोलताना त्यांनी असंही सांगितलं की, “खेल क्षेत्रात नाव कमावलेल्या अनेक दिग्गजांची नावे स्टॅण्डला दिली जात आहेत. विजय मर्चंट, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री... आणि आता भारताचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा. रोहितच्या कर्तृत्वामुळे क्रिकेटप्रेमींच्या मनात त्याचं खास स्थान निर्माण झालं आहे. त्याच्या कामगिरीची आठवण कायम रहावी म्हणून स्टॅण्डचं नाव त्याच्या सन्मानार्थ ठेवणं, हा योग्य निर्णय आहे.”

“क्रिकेटवरचा विश्वास, नात्यांचं जतन”, पवारांचा भावनिक संदेश

शरद पवारांच्या भाषणात क्रिकेटवरील प्रेम, जुन्या सहकाऱ्यांची आठवण, आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा हेतू हे सगळं स्पष्ट जाणवत होतं. वानखेडे स्टेडियमचं हे स्टॅण्ड नामकरण केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर क्रिकेट संस्कृतीची आणि त्यामागच्या प्रयत्नांची आठवण जपणारा प्रसंग होता.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती