नागपूरची महिला लडाखच्या सीमेवरुन रहस्यमयरित्या गायब, गुप्तचर संस्थांकडून शोध सुरु

Published : May 16, 2025, 01:39 PM ISTUpdated : May 17, 2025, 04:07 PM IST
nagpur crime

सार

नागपूर येथील महिला आणि तिची मुलगा लडाखला फिरायला गेले होते. या दरम्यान दोघे बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दोघांचा शोध घेण्यात येत आहे. गुप्तचर संस्थाही या कामी मदत करत आहेत.

नागपूर - भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाखमधील कारगिल जिल्ह्यातून नागपूरच्या एका महिलेच्या रहस्यमयरित्या गायब होण्याची घटना समोर आली आहे. यामुळे स्थानिक पोलिसांपासून ते गुप्तचर संस्थांपर्यंत खळबळ उडाली आहे.

गेल्या आठवड्यात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये जवळपास चार दिवस चाललेल्या लष्करी संघर्षानंतर १० मे रोजी शस्त्रसंधी झाली. मात्र त्यानंतरही सीमेलगतच्या हालचालींवर अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.

महिला आणि मुलाची सीमेलगत भ्रमंती

नागपूरच्या संबंधित महिला आपल्या १५ वर्षांच्या मुलासह ९ मे रोजी कारगिलमध्ये आली होती. त्यांनी एका स्थानिक हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. या काळात ते सीमेलगतच्या विविध गावांमध्ये पर्यटनासाठी जात होते.

१४ मे रोजी, महिलेने आपल्या मुलाला हॉटेलमध्ये ठेवून हुंडरबन या कारगिलमधील शेवटच्या गावाला भेट दिली. हे गाव LOC (नियंत्रण रेषे) पासून अगदी काही किलोमीटर अंतरावर असून, अत्यंत संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्या दिवशी संध्याकाळपासूनच ती महिला परतली नाही.

पोलिस तपास आणि संशयाच्या छायेत घटना

कारगिलचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन यादव यांनी एका इंग्रजी दैनिकाला सांगितले की, हॉटेल कर्मचार्‍यांनी महिलेच्या अनुपस्थितीबाबत संध्याकाळी तक्रार केली. पोलीस पथक हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर चौकशी करण्यात आली. महिलेच्या मुलाने सांगितले की, ते मागील काही दिवसांपासून सीमेलगत फिरत होते आणि कारगिलमध्ये येण्याआधी त्यांनी पंजाबमधील काही ठिकाणीही यात्रा केली होती.

या पार्श्वभूमीवर गायब झालेली महिला केवळ पर्यटक होती की तिचा या संवेदनशील भागातील वावर नियोजित होता? या प्रश्नावरून संशयाचे मळभ दाटले आहे. गुप्तहेर असल्याचा कयासही व्यक्त केला जात आहे.

विशेष पथक तयार, शोधकार्य सुरु

महिलेच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष शोध पथक तयार केले असून, तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात येत आहे. स्थानिक सुरक्षा यंत्रणा, लष्कर व गुप्तचर विभागही सतर्क झाले आहेत.

दरम्यान, या महिलेचा पाकिस्तानशी संबंध आहे का? तिचा सीमेलगत फिरण्याचा हेतू नक्की काय होता? हे सर्व तपासाअंती स्पष्ट होईल. पोलिसांनी सध्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचता सर्व शक्यता तपासत आहेत.

सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान

भारत-पाक संघर्षानंतर कारगिलसारख्या संवेदनशील भागातून नागरिक गायब होण्याची ही घटना सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या हालचालींवर कडक नियंत्रण आणण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.

सध्या संबंधित महिला जिवंत आहे की नाही? तिच्या गायब होण्यामागे देशविघातक हेतू आहे का? हे तपासणं आता लडाख पोलिसांसह केंद्रातील यंत्रणांसाठीही अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ration Card : दीड वर्षानंतर रेशनकार्ड धारकांना बंपर लॉटरी! 'या' वस्तूचा लाभ मिळणार, लगेच तपासा!
आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे