
कोल्हापूर/धाराशिव/लातूर : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले असून, राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतून आज हजारो शेतकऱ्यांनी महामार्ग अडवून सरकारला जोरदार इशारा दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे–बंगळूर महामार्ग तब्बल २.५ तास बंद ठेवण्यात आला. हजारो शेतकऱ्यांनी "एकच जिद्द...शक्तीपीठ रद्द"च्या घोषणा देत आंदोलन पेटवले. यात विविध राजकीय पक्षांचे स्थानिक नेते सहभागी झाले.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धुळे–सोलापूर महामार्गावर ठिय्या देत वाहतूक ठप्प केली. वाहनांच्या सुमारे १० किमी लांब रांगा लागल्या. प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये चर्चेचे प्रयत्न झाले, पण आंदोलन सुरूच राहिले.
सांगलीत अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी "हा लढा शेतीच्या अस्तित्वासाठी आहे" असे म्हणत सरकारच्या भूमी अधिग्रहण धोरणावर टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जमीन गेली तर न्याय्य भरपाई, पुनर्वसन आणि वैकल्पिक जमीन द्या, अन्यथा लढा पेटेल!
लातूर जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासनाने आजची जमीन मोजणी थांबवली. हा निर्णय तात्पुरता असला तरी असंतोष अजूनही कायम आहे.