
मुंबई : धुळे ग्रामीणचे माजी काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करून जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठा भूकंप घडवला आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी अधिकृत प्रवेश केला.
धुळे जिल्ह्यात काँग्रेसमध्ये महत्वाचे योगदान असलेल्या पाटील घराण्याची सात दशकांची काँग्रेसशी निष्ठा या प्रवेशामुळे संपुष्टात आली आहे. कुणाल पाटील यांचे आजोबा काँग्रेसचे खासदार होते, तर वडील दिवंगत रोहीदास पाटील हे राज्यात अनेक खात्यांचे मंत्री होते.
राजकीय विश्लेषकांच्या मते, पाटील यांचा भाजपप्रवेश हा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी गंभीर धक्का मानला जात आहे. पाटील यांचे स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व असल्याने भाजपला ग्रामीण भागात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.