
सातारा : राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. सततच्या पावसाने अनेक नद्यांना पूर आले आहेत. तर पुराचं पाणी रस्त्यांचं साचल्याने रस्ते जलमय झाले आहेत. मुसळधार पावसात राज्यभरात शेकडो दुर्दैवी घटना घडल्या. यात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. साताऱ्यातही अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
साताऱ्यातील फलटण तालुक्यातील खामगाव इथे एकाच कुटुंबातील चार जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. हे चौघे पारधी समाजातील होते. या कुटुंबाच्या घरासमोर एक विजेची केबल होती. ती केबल उघडी होती. त्यातच मुसळधार पाऊस झाला होता. कुटुंबातील एकाचा विजेच्या केबलच्या उघड्या तारेला स्पर्श झाला आणि त्याला विजेचा धक्का बसला. त्याला वाचवायला कुटुंबातील दुसरा गेला आणि तोदेखील विजेच्या तारेला चिकटला. एकमेकांना वाचवण्यासाठी चौघेही एकामागे एक गेले. मात्र सर्वांनाच विजेच्या जोरदार झटका बसला आणि एकाच वेळी एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, फलटणमधील घटनेनंतर परिसरात शोककळा
या दुर्घटनेत दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. फलटणमधील या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली आहे. शिंदे कुटुंबाच्या जाण्याने फलटणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबाच्या घराबाहेर मोठी गर्दी जमा झाली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसानंतर झालेल्या या दुर्घटनेनंतर प्रशासन, तसंच महावितरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घराबाहेर विजेची केबल उघडीच होती. त्या उघड्या तारेमुळे संपूर्ण कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला. मुसळधार पावसात नागरिकांनी उघड्या तारांपासून, तसंच रस्त्यांवरील विजेचे खांब यापासन दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.