Satara Rain : महाबळेश्वरमध्ये तुफान पाऊस, नदीवरील पूल खचला; शेकडो पर्यटक अडकले

Published : Jul 06, 2026, 09:43 PM IST
Satara Mahabaleshwar Rain

सार

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वरमध्ये नदीवरील एक पूल खचल्याची घटना समोर आली आहे. पूल खचल्यानंतर तिथे अडकलेल्या पर्यटकांना आणि वाहनांना क्रेनच्या मदतीने सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. 

सातारा : महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, पुणे, नाशिक, साताऱ्यासह सर्वदूर पावसाने हजेरी लावली. महाबळेश्वरमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. महाबळेश्वरमध्ये आलेल्या अतिवृष्टीने वेण्णा नदीला पूर आला आहे. पुराचं पाणी रस्त्यांवर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरात वेण्णा नदीवरील छोटा पूल खचला. या पुलाच्या पलीकडे अनेक पर्यटक अडकले होते.

नदीवरील छोटा पूल खचला

वेण्णा लेक परिसरात शेकडो पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी आले होते. मात्र मुसळधार पावसामुळे या भागात पाणी साचल्याने अनेक पर्यटक वेण्णा लेक परिसरात अडकले होते. यातच वेण्णा नदीवरील छोटा पूल खचल्यानंतर पर्यटक येथील हॉटेल्समध्ये नदीपलीकडे अडकले होते. पर्यटक अडकल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर बचाव पथकाकडून क्रेनच्या मदतीने पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात आली.

अर्धवट तुटलेल्या पुलावरुन रेस्क्यू ऑपरेशन

वेण्णा नदीवरील छोटा पूल तुटल्यानंतर त्या अर्धवट तुटलेल्या पुलावर काही कार अडकल्या होत्या. पर्यटकांना बाहेर काढल्यानंतर तुटलेल्या पुलावर अडकलेली चार ते पाच वाहनं सुरक्षितपणे क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली.

गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन

दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यासह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस आहे. हवामान विभागाने घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या अलर्टनंतर सातारा, महाबळेश्वर, वाई अशा पाच तालुक्यात शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. पावसाचा जोर ८ जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदी, धरण, धबधबे अशा ठिकाणी नागरिकांना न जाण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुनच काम अर्थात वर्क फ्रॉम होम देण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत कोणताही जीआर काढण्यात आला नाही, मात्र माणुसकी म्हणून हे केलं जावं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी घरातूनच काम करण्याच्या सूचना केल्या आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Pune Rain : पावसाचा अलर्ट, वारकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची सूचना
Nashik Rain : नाशिक, त्र्यंबकेश्वर भागात ढगफुटीची शक्यता, मुख्यमंत्र्यांची माहिती