पुणे: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर फरार असलेला वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला आहेत. शरण येण्यापुर्वी वाल्मिक कराड याने व्हीडिओ जारी केला आहे.
व्हिडीओत वाल्मिक कराड म्हणाला, "केज पोलिस स्टेशनला खोटी फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनीचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव या प्रकरणात जोडलं जात आहे. पोलिस तपासात मी दोषी दिसलो तर न्यायालय जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे."
वाल्मिक कराड हे महाराष्ट्रामध्येच असल्याचं सांगण्यात येत होतं. त्याच्या शोधासाठी सीआयडीने त्यांची विशेष पथके पाठवली होती. सीआयडीने या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी ९ विशेष पथके तैनात केली आहेत. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, वाल्मिक कराडचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत. वाल्मिक कराड नव्हे तर त्याच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास ही चौकशी सुरु होती.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. या हत्याकांडाच्या निषेधार्थ बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती.
आणखी वाचा-
बीड हत्याकांड: देवेंद्र फडणवीस सरकारपुढील अडचणींमध्ये वाढ, मुंडे राजीनामा देणार?