
Sangamner Acid Attack : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. वडगाव पान परिसरात शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या इयत्ता सहावीतील ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात नराधमाने ॲसिड फेकल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
संगमनेरमधील वडगाव पान येथे ही विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. उन्हाळ्यामुळे शाळा सकाळी भरत असून, दुपारी सुमारे ११:३० ते १२:४५ च्या दरम्यान शाळा सुटल्यानंतर ती सायकलवरून घरी जात होती. याच वेळी एका अज्ञात युवकाने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवले. काही क्षणातच त्या युवकाने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
हल्ल्यानंतर वेदनेने विव्हळलेल्या मुलीच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले. त्यांनी मुलीला प्रथम जम्बुकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा नगर रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, मुलीचा चेहरा उजव्या डोळ्याजवळ सुमारे ७ टक्के भाजला असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीच्या शोधासाठी १० विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
पीडित मुलगी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. वडिलांचे निधन झाले असून आई मोलमजुरी करून घर चालवते. या घटनेमुळे कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे.
या घटनेवर राजकीय स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार चित्रा वाघ यांनी या घटनेचा निषेध करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री आणि पालकमंत्री विखे पाटील स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
या अमानुष हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस सर्व शक्यता तपासत असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.