Akola Railway Rescue : अकोला स्टेशनवर RPF महिला अधिकाऱ्याचा थरार! चालत्या ट्रेनखाली जाणाऱ्या महिलेला वाचवलं

Published : Oct 19, 2026, 11:01 AM IST
Akola Railway Rescue : अकोला स्टेशनवर RPF महिला अधिकाऱ्याचा थरार! चालत्या ट्रेनखाली जाणाऱ्या महिलेला वाचवलं

सार

अकोला रेल्वे स्टेशनवर एका ५५ वर्षीय महिलेचा जीव थोडक्यात बचावला. चालत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडणाऱ्या या महिलेला RPF अधिकारी सोनल इंगळे यांनी देवदूत बनून वाचवलं.

मुंबई : अकोला रेल्वे स्टेशनवर एका RPF (रेल्वे सुरक्षा दल) अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. चालत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये पडणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेला त्यांनी अवघ्या काही सेकंदात खेचून बाहेर काढलं. असिस्टंट सब-इन्स्पेक्टर सोनल इंगळे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव असून, गेल्या सात दिवसांत त्यांनी केलेलं हे दुसरं रेस्क्यू आहे.

ही घटना १७ ऑक्टोबर रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली. नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस (२२१३८) स्टेशनवरून सुटत होती. संगीता भरत खत्री असं या बचावलेल्या महिलेचं नाव आहे. त्या आपल्या एका वृद्ध नातेवाईकाला सोडण्यासाठी स्टेशनवर आल्या होत्या.

जैन मंदिरात जाणाऱ्या भाविकांची ट्रेनमध्ये मोठी गर्दी होती. याच गडबडीत संगीता यांनी विरुद्ध दिशेने चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा तोल गेला आणि त्या थेट ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये घसरू लागल्या.

सुदैवाने सोनल इंगळे तिथेच ड्युटीवर होत्या. महिलेला पडताना पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली. त्यांनी संगीता यांना घट्ट पकडलं आणि प्लॅटफॉर्मच्या दिशेने ओढलं. यामुळे एक मोठा आणि जीवघेणा अपघात टळला. या घटनेत संगीता यांना केवळ किरकोळ खरचटलं आहे.

या थरारक घटनेनंतर संगीता खत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोनल इंगळे आणि रेल्वे प्रशासनाचे मनापासून आभार मानले.

अकोला स्टेशनवर प्रवाशांचा जीव वाचवण्याची सोनल इंगळे यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी १० ऑक्टोबरलाही त्यांनी अशीच एक धाडसी कामगिरी केली होती. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर अहमदाबादहून चेन्नईला जाणाऱ्या नवजीवन एक्सप्रेसमध्ये (१२६५५) चढताना एका दिव्यांग वृद्ध प्रवाशाचा तोल गेला होता, तेव्हाही इंगळे यांनीच त्यांना सुखरूप वाचवलं होतं.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

YCM Hospital Pune : पुण्यातील रुग्णालयात पोस्टमॉर्टम रूममध्ये दारूची पार्टी, डॉक्टर निलंबित
Human Egg Racket : ३० हजारांसाठी मानवी स्त्रीबीजांची विक्री? ४० महिलांच्या शोषणाप्रकरणी ईडीचे छापे