Rajya Sabha Election 2026 : शरद पवारांविरुद्ध शिंदे गटाचे दोन उमेदवार? महाराष्ट्रातील 7 जागांसाठी राजकीय रणसंग्राम

Published : Mar 05, 2026, 09:41 AM IST
Sharad Pawar and Eknath Shinde

सार

Rajya Sabha Election 2026 : राज्यसभा निवडणूक 16 मार्च रोजी होणार असून महाराष्ट्रातील 7 जागांसाठी राजकीय चुरस वाढली आहे. भाजपने चार उमेदवार जाहीर केले आहेत, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  

Rajya Sabha Election 2026 : राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून देशभरातील 37 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडल्या जाणार आहेत. या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील चुरस वाढली आहे. दरम्यान, शरद पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून दोन उमेदवार उभे करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भाजपकडून चार उमेदवारांची घोषणा

दरम्यान, भाजपाकडून राज्यसभेसाठी चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात रामदास आठवले, विनोद तावडे, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील संख्याबळ लक्षात घेता भाजपचे हे चारही उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून संभाव्य उमेदवार

शिवसेना शिंदे गटाकडून अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र पक्षाकडून अनेक नेते इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य उमेदवारांमध्ये राहुल शेवाळे, शायना एनसी, ज्योती वाघमारे, संजय निरुपम, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ, हेमंत गोडसे आणि संजय महाडिक यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

शरद पवारांसमोर शिंदेंचे आव्हान

महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. तसेच अजित पवार यांच्या गटाकडून पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. शिंदे गटाने दोन उमेदवार उभे केल्यास पवारांसाठी निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभा जागांचे गणित

महाराष्ट्र विधानसभेतील विद्यमान सदस्यसंख्या 286 आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी सुमारे 36 आमदारांचे मत आवश्यक आहे. महायुतीकडे एकूण 232 आमदारांचे संख्याबळ असल्याने त्यांच्या काही उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. भाजपकडे 136 आमदार आहेत, तर शिवसेनेकडे 56 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे 40 आमदार आहेत. या संख्याबळानुसार महायुतीकडे अतिरिक्त मते असल्याने सातव्या जागेसाठीही रणनीती आखली जात आहे.

राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक

निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे.

  • 5 मार्च: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
  • 6 मार्च: अर्जांची छाननी
  • 9 मार्च: उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख
  • 16 मार्च: सकाळी 9 ते सायंकाळी 4 मतदान, सायंकाळी 5 नंतर मतमोजणी

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य

महाराष्ट्रातून काही महत्त्वाचे सदस्य यंदा राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यामध्ये शरद पवार, रामदास आठवले, फौजिया खान, रजनी पाटील, प्रियांक चतुर्वेदी, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांचा समावेश आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Farmer Loan Waiver : महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 30 जूनपूर्वी? समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात
Weather Alert: सावधान! सूर्य आता आग ओकणार; महाराष्ट्रातील 'या' ३ जिल्ह्यांवर उष्णतेचं संकट, जाणून घ्या हवामान अपडेट