
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. सध्या मराठी विरुद्ध अमराठी वादावरून राज्यात वातावरण तापलेलं आहे, विशेषतः मिरा-भाईंदर येथील मनसेच्या आजच्या मोर्चानंतर हा वाद अधिकच तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना माध्यमांशी बोलण्यावर नियंत्रण आणले आहे.
मिरा-भाईंदर येथे मनसेच्या मोर्चाआधी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि भाजपच्या काही नेत्यांनी मनसेला इशारा दिल्यानंतर हा तणाव वाढला आहे. या सर्व घडामोडींमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज ठाकरे यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून हा आदेश दिला आहे.
राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत हा आदेश लागू केला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, "एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजीटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय त्यांनी देखील कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही."
या आदेशामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. कदाचित ते लवकरच पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, नुकत्याच ५ जुलै रोजी वरळी डोम सभागृहात झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक महत्त्वाचा आदेश दिला होता. मराठी भाषा बोलण्यावरून वाद घालणाऱ्यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ बनवू नका आणि ते कुठे शेअरही करू नका, असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यानंतर आता त्यांनी माध्यमांशी संवाद साधण्यावर नवीन निर्बंध लादले आहेत. आगामी काळात या घडामोडींचे काय परिणाम होतात आणि राज ठाकरे कोणती नवी भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.