Pune : एकाच ड्युटीपासून प्रेमापर्यंतचा प्रवास; दोन महिला पोलिसांचा विवाह चर्चेत

Published : Aug 25, 2026, 09:15 AM IST
Maharashtra Police

सार

पुणे पोलीस दलातील दोन महिला पोलिसांमध्ये निर्माण झालेल्या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. दोघींनी आळंदीत ३० ऑगस्ट रोजी विवाह करण्याचे ठरवले. याच संदर्भात सोशल मीडियात पोस्टही तुफान व्हायरल झाली आहे.

मुंबई : पुणे पोलीस दलातील दोन महिला पोलिसांच्या प्रेमसंबंधाची आणि विवाहाच्या निर्णयाची सध्या चर्चा रंगली आहे. दोघींची पोलीस भरतीनंतर एकाच ठिकाणी नियुक्ती झाली. राहण्यासाठीही एकाच ठिकाणी व्यवस्था झाली. यामुळे त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. कालांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघींनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेत आळंदीत ३० ऑगस्ट रोजी विवाह करण्याचे ठरवले होते. यासाठी रजेचा अर्जही करण्यात आला होता. मात्र, सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर विवाह सोहळा लांबणीवर टाकल्याचे सांगितले जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या या दोन्ही महिला पोलिसांची पोलीस शिपाई पदावर नियुक्ती झाली होती. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दोघींना पोलीस मुख्यालयात नियुक्ती मिळाली. इतर महिला पोलिसांसोबत त्या एकाच घरात राहत होत्या. याच काळात त्यांच्यात मैत्री निर्माण झाली.

एकाच पोलीस ठाण्यात नियुक्ती

पोलीस मुख्यालयातील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर दोघींना शहरातील मध्यवर्ती भागातील एकाच पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली. एकाच घरात राहणाऱ्या इतर दोन महिला पोलिसांनी आपले राहण्याचे ठिकाण बदलले. मात्र या दोघी एकत्रच राहू लागल्या. त्यानंतर त्या दोघींमधील जवळीक वाढल्याचे सांगितले जात आहे.

विवाहाचा निर्णय; रजेचा अर्जही केला

जवळीक वाढल्यानंतर दोघींनी एकत्र विवाह करण्याचा निर्णय घेतला. आळंदी येथे ३० ऑगस्ट रोजी विवाह करण्याचे निश्चित करण्यात आले होते. यासाठी दोघींनी रजेचा अर्जही केला होता. पण यापैकी एका महिला पोलिसाच्या कुटुंबीयांचा या विवाहाला विरोध असल्याची चर्चा आहे.

सोशल मीडियावरील चर्चेनंतर विवाह लांबणीवर?

दोन महिला पोलिस विवाह करणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर पुण्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट व्हायरल झाली. त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या गेल्या. त्यानंतर दोघींनी संयम राखत नियोजित विवाह सोहळा लांबणीवर टाकल्याचे सांगितले जात आहे.

लिंगबदल शस्त्रक्रियेबाबतही चर्चा

यापैकी एका महिला पोलिसाने मुंबईतील एका रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी उपचार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाबाबत अधिकृत पातळीवर सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पिंपरी-चिंचवडमध्ये यापूर्वीही असे प्रकरण

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात यापूर्वीही एका महिला पोलिसाने लिंगबदल शस्त्रक्रिया केल्याचे प्रकरण समोर आले होते. शस्त्रक्रियेनंतर पुरुष पोलीस कर्मचारी म्हणून नोंद करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

MPSC पेपरफुटीची चौकशी होणार, दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली समिती
Pune Ambulance Video: धावत्या रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरसह रुग्ण खाली पडला, व्हिडिओ व्हायरल