
पुणे : पुण्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. गुरुवारी (१२ फेब्रुवारी) संपूर्ण दक्षिण पुणे भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून, त्यानंतरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पाणी उशिराने व कमी दाबाने येण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या टप्पा क्रमांक एकमध्ये देखभाल व दुरुस्तीचे अत्यावश्यक काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी गुरुवारी संपूर्ण दिवस पंपिंग बंद ठेवावे लागणार असल्याने मोठ्या भागाचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे.
या दुरुस्तीअंतर्गत वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य जलवाहिनीवर ‘बंद प्लेट’ बसवणे, तीन नवीन ‘किऑस्क’ बसवणे ही तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा पूर्णतः थांबवण्यात येणार आहे.
सिंहगड रस्ता परिसर
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, आंबेगाव खुर्द व बुद्रुक
सातारा रस्ता व कात्रज भाग
धनकवडी, कात्रज गावठाण, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, संतोषनगर, बालाजीनगर, सुखसागर नगर
दक्षिण पुणे व अन्य भाग
कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर २, आंबेडकरनगर, टिळकनगर, दाते स्टॉप, सच्चाई माता टाकी, वंडर सिटी, मोरेबाग, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, वरखेडेनगर तसेच प्रभाग क्रमांक ४१
गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद आणि शुक्रवारी कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी बुधवारीच आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. या नियोजित कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे असेही सांगण्यात आले आहे.