
Chandrapur Mayor Election : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून तीन आठवडे उलटल्यानंतरही सुरू असलेले सत्तानाट्य अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. काँग्रेसला घवघवीत यश मिळूनही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापौरपदावरून पक्षांतर्गत वाद उफाळला होता. मात्र, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने चंद्रपूर महापालिकेत सत्ता भाजपच्या हाती गेली आहे.
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपला पाठिंबा दिल्यामुळे भाजपसाठी महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार, भाजपच्या संगीता खांडेकर या महापौरपदाच्या निवडणुकीत अवघ्या एका मताच्या फरकाने विजयी झाल्या आहेत.
या महानगरपालिकेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र बहुमतापासून काही जागा कमी पडल्याने पक्षात खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटात महापौरपदावरून मतभेद निर्माण झाले. हा तिढा काही दिवसांपूर्वी दिल्ली स्तरावर सुटल्याचे सांगितले जात होते, मात्र तोपर्यंत राजकीय समीकरणे बदलली होती.
महापौर निवडीवरून सुरू असलेल्या चर्चांदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी प्रतिक्रिया दिली होती. चंद्रपूरमध्ये काँग्रेसकडे ३२ सदस्य असून बहुमतासाठी दोन सदस्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीने गट स्थापन केला असून, त्यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत युती नको, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांना दिल्याचे सांगितले जात असताना चंद्रपूरमध्ये मात्र भाजप–शिवसेना (उबाठा) युती जाहीर झाली आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे या निर्णयावर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.