
Supriya Sule Daughter Marriage : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबात आनंदाची बातमी आहे. सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिचं लग्न निश्चित झालं असून, नागपूरचे उद्योजक सारंग अरुण लखानी यांच्यासोबत ती विवाहबंधनात अडकणार आहे. या महत्त्वाच्या घडामोडीची माहिती माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली आहे.
सारंग अरुण लखानी हे मूळचे नागपूरचे असल्याने रेवती सुळे नागपूरची सून होणार आहेत. विशेष म्हणजे या विवाहासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे हा विवाह केवळ कौटुंबिकच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे.
सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. उद्योगविश्वात सक्रिय असण्यासोबतच सारंग लखानी हे उत्तम बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, क्रीडा क्षेत्रातही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुले आहेत. रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (London School of Economics) येथून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रथमच राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत, आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती.