Swargate Rape Case : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचा उच्च न्यायालयात जामीन अर्ज; सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेची मागणी

Published : Feb 25, 2026, 08:04 AM IST
Swargate Rape Case

सार

Swargate Rape Case : स्वारगेट बलात्कार प्रकरणाला वर्ष पूर्ण झाले असूनही आरोप निश्चिती प्रलंबित आहे. आरोपीने जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. ८९२ पानी आरोपपत्रात अनेक तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे नमूद करण्यात आले आहेत.

Swargate Rape Case : पुणे शहराला हादरवून सोडणाऱ्या स्वारगेट बलात्कार प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले असले, तरी अद्याप न्यायालयात आरोप निश्चिती झालेली नाही. आरोपी दत्तात्रय गाडे याने जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय येथे धाव घेतली असून, पुणे सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेचा अर्ज दाखल केला आहे. या अर्जांवर आदेश आल्यानंतरच खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा होणार आहे.

काय आहे प्रकरण?

२५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे स्वारगेट आगारातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. गुन्ह्यानंतर तो गावातील शेतात लपून बसला होता. पुणे पोलिसांनी त्याला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

८९२ पानी आरोपपत्र; ८२ साक्षीदारांची नोंद

तपास अधिकारी शैलेश संखे यांच्या पथकाने ५२ दिवसांत ८९२ पानांचे आरोपपत्र दाखल केले. एकूण ८२ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली असून, पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले गेले आहेत. १२ पंचनाम्यांमध्ये गुगल सर्च हिस्टरी, ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी निवेदनांचा समावेश आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसार, तर पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले बाजू मांडत आहेत.

जामीन अर्ज फेटाळला; उच्च न्यायालयात धाव

आरोपीचा जामीन अर्ज पुणे न्यायालयाने यापूर्वी फेटाळला आहे. त्यानंतर आरोपीने ॲड. वाजेद खान बीडकर यांच्या मार्फत उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. तसेच सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेची मागणी केली आहे. आरोपीच्या अर्जांना पुणे पोलिस, सरकारी वकील आणि पीडितेच्या वकिलांनी विरोध दर्शवला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरच आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

तपासातील ठळक मुद्दे

  1. घटनास्थळावर सापडलेले केस व शर्टाचे बटण रासायनिक तपासणीत आरोपीचेच असल्याचे निष्पन्न.
  2. पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपीला घटनास्थळी पाहिल्याचे जबाब दिले.
  3. ससून रुग्णालयातील तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोपी लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल दिला.
  4. सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी घटनास्थळी उपस्थित असल्याचे नमूद.
  5. मोबाइलच्या ‘गुगल सर्च हिस्टरी’मध्ये अश्लील व्हिडिओ पाहिल्याचे आढळले.
  6. ओळख परेडमध्ये पीडितेने आरोपीची ओळख पटवली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Sangamner Acid Attack : संगमनेरमध्ये ११ वर्षीय विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला; जिल्ह्यात खळबळ, आरोपीच्या शोधासाठी १० पथके तैनात
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट! उद्या २४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा