
मुंबई: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. घाटातील वाहतूक कोंडीतून कायमची सुटका करणाऱ्या बहुप्रतिक्षित 'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मे २०२६ पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) केले आहे.
या प्रकल्पाचे जवळपास ९८ टक्के काम पूर्ण झाले असून आता केवळ फिनिशिंगचे काम बाकी आहे. हा मार्ग खुला झाल्यानंतर लोणावळा घाटातील वळणदार रस्ता आणि वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार असून प्रवासाचा वेळ किमान २० ते २५ मिनिटांनी वाचणार आहे.
सुरक्षिततेचा उपाय म्हणून एमएसआरडीसी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
हलकी वाहने: सुरुवातीच्या टप्प्यात केवळ कार आणि इतर हलक्या वाहनांनाच या लिंकवरून प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे.
टँकरवर बंदी: ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकर्सना या मार्गावर सध्या परवानगी नाकारली जाऊ शकते.
अपघातांना लगाम: गेल्या काही दिवसांत टँकर उलटल्यामुळे झालेल्या भीषण कोंडीचा अनुभव पाहता, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
या मिसिंग लिंकमध्ये आशियातील सर्वात लांब आणि जगातील सर्वात रुंद बोगद्यांचा समावेश आहे. यामुळे खंडाळा घाटातील तीव्र चढ-उतार आणि दरडी कोसळण्याचा धोकाही टळणार आहे.