
पुणे : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक काही दिवसांवर आली असून, यानिमित्ताने शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पोलिसांनी जाहीर केलेल्या या बदलांमध्ये अनेक प्रमुख रस्ते बंद ठेवणे, काही ठिकाणी 'नो-पार्किंग' आणि पर्यायी पार्किंगची व्यवस्था करणे यांचा समावेश आहे. वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यातील पारंपरिक गणपती विसर्जन मिरवणूक शनिवारी, 6 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता सुरू होईल. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक, मंडळे आणि ढोल-ताशा पथके सहभागी होतात. त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत काही महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील.
सकाळी 7 पासून: राहुल गांधी चौक, काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक, लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक) या मार्गांवर वाहतूक बंद राहील.
सकाळी 9 पासून: बगाडे रस्ता (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक) आणि गुरुनानक रस्ता (देवजीबाबा चौक ते गोविंद हलवाई चौक) बंद होतील.
सकाळी 10 नंतर: दारूवाला पूल ते जिजामाता चौक, तसेच केळकर रस्ता (बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक) वाहतुकीसाठी बंद केला जाईल.
दुपारी 12 नंतर: बाजीराव रस्ता (सावरकर चौक ते फुटका बुरुज चौक), कुमठेकर रस्ता (टिळक चौक ते चितळे कॉर्नर), आणि शास्त्री रस्ता (सेनादत्त चौकी ते अलका टॉकीज चौक) बंद होतील.
सायंकाळी 4 पासून: जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडोजी बाबा चौक), कर्वे रस्ता (नळ स्टॉप ते खंडोजी बाबा चौक), फर्ग्युसन कॉलेज रस्ता, भांडारकर रस्ता, सातारा, सोलापूर आणि प्रभात रस्ता या प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद असेल.
सकाळी 8 वाजल्यापासून लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता या मार्गांवर वाहने उभी करता येणार नाहीत.
वाहनचालकांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. दुचाकींसाठी पेशवे पार्क, सारसबाग, पाटील प्लाझा, दांडेकर पूल, गणेशमळा, निलयम टॉकीज आणि मराठवाडा कॉलेज येथे सोय आहे. तसेच, चारचाकी व दुचाकींसाठी शिवाजी आखाडा, एआयएसएसपीएमएस मैदान, एसपी कॉलेज, संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान, फर्ग्युसन कॉलेज, जैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता मैदान आणि नदीपात्रातील भिडे पूल ते गाडगीळ पूल येथे पार्किंग उपलब्ध असेल.
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील 10 महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक वळवली जाईल. यात झाशीची राणी चौक, गाडगीळ पुतळा, दारूवाला पूल, संत कबीर चौकी, सेव्हन लव्हज चौक, व्होल्गा चौक, सावरकर चौक, सेनादत्त चौक, नळ स्टॉप आणि गुडलक चौक यांचा समावेश आहे.
गणपती विसर्जनाच्या वेळी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी केलेल्या या नियोजनाला सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून मिरवणुकीचा आनंद घ्यावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.