
पुणे : पुणे रेल्वे स्थानकासमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर एका तरुणाने कोयत्याने वार करत विटंबना केली. भगवे वस्त्र परिधान करून आलेल्या सुरज शुक्ला या तरुणाच्या या कृत्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
या घटनेनंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले आणि दुग्धाभिषेक करत गांधींना अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले, "गेल्या १२ वर्षांत भाजप सरकारने समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडवल्या आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनच्या नामांतराची केलेली मागणी." "नामांतराच्या वादाचा धुरळा अजूनही खाली बसलेला नाही, तोवर भगवे कपडे घालून एका तरुणाने राष्ट्रपित्याच्या पुतळ्यावर हल्ला केला यामागे कोणाचा हात आहे, याची चौकशी झालीच पाहिजे," अशी मागणी शिंदे यांनी केली.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधींच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. या विटंबनेमुळे गांधी विचारांवर श्रद्धा असलेल्या प्रत्येक नागरिकाच्या भावना दुखावल्या गेल्याचे शिंदे यांनी सांगितले. "आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत," असा ठाम पवित्रा काँग्रेसने घेतला.
या घटनेनंतर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधी पक्षांनी ही घटना भाजपच्या विचारसरणीचा परिपाक असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांकडूनही तपास सुरू असून आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महात्मा गांधी यांच्यासारख्या शांतता, सहिष्णुता आणि अहिंसेच्या प्रतीक असलेल्या व्यक्तिमत्वाची विटंबना केवळ पुतळ्यावर नाही, तर संपूर्ण राष्ट्राच्या मूल्यांवर हल्ला आहे. पुण्यात घडलेली ही घटना चिंताजनक असून, याविरोधात सर्वपक्षीय आवाज बुलंद होणे गरजेचे आहे.